घरच्या मैदानावर खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जला मुंबई इंडियन्सने पराभवाचा धक्का दिला. या पराभवानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या अडचणीत आणखी वाढ झालेली दिसत आहे. चेन्नईचा अकराव्या हंगामातला महत्वाचा गोलंदाज दिपक चहर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे किमान दोन आठवडे संघाबाहेर जाणार आहे. चेन्नईचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी दिपक चहरच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात चहरला ही दुखापत झाल्याचं समजतं आहे.

गेल्या सात सामन्यांमध्ये दिपक चहरने सहा बळी घेतले आहेत. सनराईजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिपक चहरने १५ धावा देत ३ बळी घेतले होते, आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये दिपकची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. एकीकडे दिपक चहर संघाबाहेर जात असला तरीही दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज लुंगीसानी निगडी संघात परतला आहे. त्यामुळे दिपक चहरची अनुपस्थिती संघाला फारशी जाणवणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे.