News Flash

चेन्नई आणि राजस्थानचा विजयपथावर परतण्याचा निर्धार

आयपीएलच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या खात्यावर ४ गुण जमा आहेत

| April 20, 2018 03:17 am

महेंद्रसिंग धोनी व संजू सॅमसन

पुणे : २०१३ च्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणानंतर बंदी घालण्यात आलेले दोन संघ राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) व्यासपीठावर प्रथमच सामना करीत आहे. यावेळी क्रिकेटरसिकांचा गमावलेला विश्वास पुन्हा प्राप्त करणे, हेच त्यांचे प्रमुख लक्ष्य असेल. दोन माजी विजेत्या संघांनी आपला अखेरचा सामना गमावला असल्यामुळे विजयपथावर परतण्याचा निर्धार दोन्ही संघांनी केला आहे.

आयपीएलच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या खात्यावर ४ गुण जमा आहेत. त्यांनी आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत, तर दोन सामन्यांत पराभव पत्करला आहे. चेन्नईच्या खात्यावरसुद्धा तितकेच गुण आहेत. त्यांनी तीन सामन्यांपैकी दोन जिंकले आहेत. मात्र सरस धावगतीच्या बळावर ते चौथ्या स्थानावर आहेत.

राजस्थानची यंदाच्या हंगामातील सुरुवात खराब झाली. परंतु नंतर दोन शानदार विजय त्यांनी मिळवले. पण शेवटच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून त्यांनी ७ विकेटने पराभव पत्करला आहे. धिम्या खेळपट्टीवर राजस्थानने ८ बाद १६० अशी धावसंख्या उभारली. जी कोलकाताने तीन फलंदाजांच्या मोबदल्यात आरामात पार केली.

संजू सॅमसन हा राजस्थानच्या फलंदाजीची धुरा समर्थपणे वाहात आहे. त्याने आतापर्यंत एकूण १८५ धावा केल्या असून, नाबाद ९२ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. परंतु त्याला अन्य फलंदाजांकडून तोलामोलाची साथ मात्र मिळत आहे. के. गौथम आणि बेन लाफलिनच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या गोलंदाजीचा मारा आपली चुणूक दाखवत आहे. याशिवाय इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स त्यांच्याकडे आहे.

दुसरीकडे, दोन वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्स आणि कोलकाताला हरवून आपल्या आयपीएल अभियानाला दिमाखदार प्रारंभ केला. मुंबईविरुद्ध ड्वेन ब्राव्होने ३० चेंडूंत ६८ धावांची खेळी साकारून चेन्नईला अनपेक्षित विजय मिळवून दिला. याचप्रमाणे कोलकाताविरुद्धच्या विजयात सॅम बिलिंग्जने महत्त्वाची भूमिका बजावली. पंजाबविरुद्धच्या सामन्यात अंबाती रायुडू (४९) आणि महेंद्रसिंग धोनी (७९) यांनी विजयाचे लक्ष्य गाठण्याचा शर्थीने प्रयत्न केला. मात्र अखेरीस त्यांना ४ धावा कमी पडल्या.

चेन्नईच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व करताना शेन वॉटसन आणि शार्दुल ठाकूर यांनी अनुक्रमे ५ आणि ३ बळी मिळवले आहेत. इम्रान ताहीरची फिरकीसुद्धा प्रभाव दाखवत आहे. याशिवाय त्यांच्यकाडून हरभजन सिंग आणि रवींद्र जडेजा यांचा अनुभवसुद्धा आहे.

सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 3:17 am

Web Title: ipl 2018 chennai super kings rajasthan royals look to get back to winning ways
Next Stories
1 अखेरच्या क्षणाला प्रिती आणि वीरुने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयामुळे पंजाबला लागली ‘लॉटरी’
2 IPL 2018: मोहालीच्या मैदानात तळपली गेलची बॅट, झळकावलं मोसमातलं पहिलं शतक
3 IPL 2018 – राजस्थानविरुद्ध सामन्यात धोनी यष्टीरक्षण करणार नाही? चेन्नईच्या चिंतेत भर