सलामीवीर अंबाती रायडूने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या घरच्या मैदानावर खेळताना, सनराईजर्स हैदराबाद संघावर ८ गडी राखून मात केली. हैदराबादच्या संघाने विजयासाठी दिलेलं १८० धावांचं आव्हान चेन्नईने रायडूच्या शतकी खेळाच्या जोरावर लिलया पूर्ण केलं. रायडूने शेन वॉटसनच्या मदतीने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत, हैदराबादच्या हातातून सामना हिसकावून घेतला. मध्यंतरीच्या काळात वॉटसन आणि रैनाला बाद करुन हैदराबादच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्नही केला. मात्र धोनी आणि रायडूने त्यांचे हे मनसुबे उधळून लावले. रायडूने आजच्या सामन्यात ६२ चेंडूत नाबाद १०० धावांची खेळी केली. आयपीएलमधलं रायडूचं हे पहिलंच शतक ठरलं, तर यंदाच्या हंगामात शतक झळकावणारा रायडू चौथा फलंदाज ठरला आहे.

त्याआधी हैदराबादकडून सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी केलेल्या शतकी भागीदारी रचत चेन्नईसमोर विजयासाठी १८० धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून चेन्नईने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, हैदराबादचा सलामीवीर अॅलेक्स हेल्स लवकर माघारी परतला. मात्र यानंतर शिखर आणि विल्यमसनने संघाचा डाव सावरला. दोघांनीही अर्धशतकी खेळी करत सामन्यावर हैदराबादचं वर्चस्व प्रस्थापित केलं. या दोघांमध्येही दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. विल्यमसन – शिखर माघारी परतल्यानंतर काहीकाळ चेन्नईने सामन्यात पुनरागमन केलं होतं. मात्र दिपक हुडा आणि शाकीब अल हसनने अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करत संघाला १७९ धावांपर्यंत मजल मारुन दिली.

चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने २ फलंदाजांना माघारी धाडलं, मात्र त्याच्या ४ षटकांमध्ये हैदराबादच्या फलंदाजांनी ३२ धावांची लयलूट केली. दिपक चहरने सर्वोत्तम गोलंदाजी करत ४ षटकांत १६ धावा देत १ बळी घेतला. याव्यतिरीक्त ब्राव्होलाही सामन्यात १ बळी मिळाला.

  • ८ गडी राखून चेन्नईची हैदराबादवर मात
  • अंबाती रायडूचं आयपीएलमधलं पहिलं शतक
  • ठराविक अंतराने सुरेश रैना माघारी, चेन्नईचा दुसरा गडी माघारी
  • शेन वॉटसन धावबाद, चेन्नईचा पहिला गडी माघारी
  • अखेर चेन्नईची पहिली जोडी फोडण्यात हैदराबादला यश
  • रायडू-वॉटसनची झुंजार अर्धशतकं
  • हैदराबादचे गोलंदाज हतबल, दोन्ही फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी
  • दोन्ही फलंदाजांकडून मैदानाच्या चौफेर फटकेबाजी, चेन्नईने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा
  • पहिल्या षटकापासूनच अंबाती रायडू-शेन वॉटसन जोडीची फटकेबाजी
  • चेन्नईच्या सलामीवीरांकडून डावाची आक्रमक सुरुवात
  • चेन्नईला विजयासाठी १८० धावांचं आव्हान
  • २० षटकांत हैदराबादची १७९ धावांपर्यंत मजल
  • दिपक हुडा-शाकीब अल हसन जोडीची अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी
  • हैदराबादचा चौथा गडी माघारी
  • ठराविक अंतराने मनिष पांडे शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर माघारी
  • हैदराबादचा तिसरा गडी माघारी, चेन्नईचं सामन्यात पुनरागमन
  • पाठोपाठ शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर कर्णधार विल्यमसन माघारी
  • ब्राव्होच्या गोलंदाजीवर शिखर धवन माघारी, हैदराबादला दुसरा धक्का
  • अखेर हैदराबादची जमलेली जोडी फोडण्यात चेन्नईच्या गोलंदाजांना यश
  • विल्यमसन-शिखर धवनची अर्धशतकी खेळी
  • हैदराबादने ओलांडला १०० धावांचा टप्पा, संघाचा डाव सावरला
  • शिखर धवन – विल्यमसन जोडीमध्ये शतकी भागीदारी
  • हैदराबादने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा
  • शिखर धवन-केन विल्यमसन जोडीने संघाचा डाव सावरला
  • लय बिघडलेला अॅलेक्स हेल्स माघारी, हैदराबादला पहिला धक्का
  • शिखर धवनकडून हैदराबादच्या डावाची आक्रमक सुरुवात
  • चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय