आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सचे निराशाजनक प्रदर्शन सुरुच आहे. शनिवारी वानखेडेवर झालेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने मुंबई इंडियन्सचा सात विकेट राखून पराभव केला. मुंबईने यंदाच्या मोसमातील पराभवाची हॅटट्रीक साजरी केली आहे. जेसन रॉय दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने ५३ चेंडूत नाबाद (९१) धावांची खेळी केली. यात सहा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. गौतम गंभीर (१५) लवकर बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने सूत्रे हाती घेत दमदार फलंदाजी केली. त्याने २५ चेंडूत ४७ धावांची वेगवान खेळी केली. यात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. मुंबईने विजयासाठी दिलेले १९५ धावांचे लक्ष्य दिल्लीने शेवटच्या चेंडूवर पार केले. याआधी मुंबईचे चेन्नई आणि हैदराबाद विरुद्धचे दोन्ही सामने अटीतटीचे झाले होते. पण निर्णायक क्षणी मुंबईला कामगिरी उंचावता आली नव्हती. आजच्या सामन्यात फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली पण गोलंदाज कमी पडले. कर्णधार रोहित शर्मा आजही चमकदार कामगिरी करु शकला नाही. त्याने फक्त १८ धावा केल्या. आजच्या सामन्यात सुर्यकुमार यादव सलामीला आला होता. हा निर्णय योग्य ठरला. त्याने ३२ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. लुईसने ४८ आणि इशान किशनने ४४ धावांची खेळी केली. त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली.