20 February 2019

News Flash

IPL 2018: प्ले-ऑफच्या सामन्यांआधी धोनीने ठेवली पुणेकर कर्मचाऱ्यांची आठवण, भेटवस्तु देत केला अलविदा

चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या छोटेखानी सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

पुण्यातील गहुंजे मैदानावरील कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना धोनी

कावेरी पाणीवाटपाच्या मुद्द्यावरुन चेन्नई सुपरकिंग्जला आपल्या घरच्या मैदानाला रामराम ठोकत पुण्याची वाट धरावी लागली. चेपॉकच्या मैदानावरुन चेन्नईचा संघ पुण्याच्या गहुंजे मैदानावर आपले घरचे सामने खेळला. त्यामुळे पुणे हे चेन्नईच्या संघाचं आता दुसरं घर म्हणून ओळखलं जात आहे. चेन्नईचा संघ दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगत असताना महेंद्रसिंह धोनी हा पुण्याच्या संघाकडून खेळत होता. यावेळी धोनी आणि पुण्याचं एक वेगळं नातं निर्माण झालं होतं. आपल्या घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळल्यानंतर धोनीनेही पुण्याच्या मैदानातील कर्मचाऱ्यांची खास आठवण ठेवत त्यांचे आभार मानले आहेत.

गहुंजे मैदानावरील प्रत्येक कर्मचाऱ्याला महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपरकिंग्ज प्रशासनाकडून २० हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह बहाल केलं. यादरम्यान धोनी कर्मचाऱ्यांसोबत थट्टा-मस्करी करतानाही आढळला. चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या छोटेखानी सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आपल्या अखेरच्या सामन्यात पंजाबवर मात करुन, चेन्नईने साखळी फेरीचा शेवट गोड केला. प्ले-ऑफमध्ये चेन्नईच्या संघाची गाठ सनराईजर्स हैदराबादशी पडणार आहे. या हंगामात हैदराबादचा संघ सरस धावगतीच्या आधारावर पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे प्ले-ऑफममध्ये चेन्नईचा संघ आणि महेंद्रसिंह धोनी कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

First Published on May 22, 2018 4:11 pm

Web Title: ipl 2018 dhoni distributes awards teases pune ground staff
टॅग Csk,IPL 2018