23 October 2019

News Flash

…म्हणून मी चांगला खेळ करु शकलो – रोहित शर्मा

बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या ५२ चेंडूत ९४ धावा.

बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज खेळी करणारा रोहित शर्मा

आयपीएलच्या चौथ्या हंगामात खेळताना मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर खेळताना पहिल्या विजयाची नोंद केली. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर मात करत मुंबईने पराभवाची मालिका खंडीत केली. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ९४ धावांची तडाखेबंद खेळी केली. रोहितच्या या फॉर्ममुळे मुंबईच्या इतर फलंदाजांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेत बंगळुरुसमोर धावांचा डोंगर उभा केला. मात्र रोहितने आपल्या या खेळीचं श्रेय मुंबईचा सलामीवीर एविन लुईसला दिलं आहे.

अवश्य वाचा – IPL 2018 MI vs RCB Live Match Updates: हिटमॅनच्या तडाख्याने मुंबईचा बंगळुरुवर ‘रॉयल’ विजय

“एविन लुईससोबत जेव्हा तुम्ही फलंदाजी करत असता तेव्हा मैदानात काहीही घडू शकतं. त्याच्या पट्ट्यात येणारे सर्व चेंडू तो सीमारेषेपार घालवतो. काल एविन ज्या पद्धतीने फटकेबाजी करत होता, त्यामुळेच मी निर्धास्त होऊन खेळपट्टीवर जम बसवू शकलो. लुईस बाद झाल्यानंतर आम्ही चांगली धावसंख्या उभी केली होती, त्यामुळे आम्हाला तो बाद झाल्याचं दडपण आलं नाही. तोपर्यंत माझा जम बसल्यामुळे मी पुढची कामगिरी पार पाडली.” रोहितने लुईसच्या खेळीचं भरभरुन कौतुक केलं.

बंगळुरुच्या उमेश यादवने सामन्याच्या पहिल्याच षटकात लागोपाठ २ चेंडूंवर सुर्यकुमार यादव आणि इशान किशनचा त्रिफळा उडवत मुंबईला बॅकफूटला ढकललं. मात्र रोहित शर्मा आणि एविन लुईस जोडीने शतकी भागीदारी करत मुंबईचा डाव सावरला. पहिल्या ३ सामन्यांत पराभव पदरी पडुनही केवळ सकारात्मक दृष्टीकोनामुळे आम्ही सामन्यात विजय मिळवू शकलो असंही रोहित शर्मा म्हणाला. मुंबईकडून कृणाल पांड्या आणि मयांक मार्कंडेने टिच्चून मारा करत बंगळुरुचा डाव २० षटकांत १६७ धावांवर रोखला.

First Published on April 18, 2018 1:58 pm

Web Title: ipl 2018 evin lewis helped me to settle down says mumbai indians skipper rohit sharma