आतापर्यंतच्या सामन्यांत फारशी चमक दाखवू न शकलेल्या युवा फलंदाज इशान किशनने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) कोलकाता नाइट रायडर्सवर १०२ धावांनी दणदणीत मात केली. या विजयासह मुंबईने बाद फेरीच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल टाकले असून कोलकातासह राजस्थान व बेंगळूरु या संघांना धोक्याचा इशारा दिला आहे. विजयासाठी दिलेल्या २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याचा डाव अवघ्या १०८ धावांवर संपुष्टात आला.

त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या सूर्यकुमार यादव आणि एविन लेविस यांनी ५.४ षटकांत ४६ धावांची सलामी दिली. मग किशनने अवघ्या १७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हे यंदाच्या स्पर्धेतील तिसरे वेगवान अर्धशतक ठरले तर, मुंबईसाठी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याच्या विक्रमाशी किशनने बरोबरी केली. २१ चेंडूत पाच चौकार व सहा षटकारांसह त्याने ६२ धावा केल्या. इशानला दुसऱ्या बाजूने रोहित शर्मा, हार्दिक पांड्या यांनीही चांगली साथ दिली.

कोलकात्याकडून पियुष चावलाने ३ बळी घेतले. त्याला टॉम कुरन, प्रसिध कृष्णा आणि सुनील नरीन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली. मुंबईचे २११ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकात्यातर्फे ख्रिस लीन आणि नितीश राणा या दोघांनी सर्वाधिक २१ धावांची खेळी केली. या दोघांचा अपवाद वगळता उर्वरित फलंदाज झटपट माघारी परतले. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.

  • मुंबईच्या भेदक माऱ्यापुढे कोलकात्याच्या फलंदाजांची शरणागती, मुंबई १०२ धावांनी विजयी
  • कोलकाताचा नववा गडी बाद, मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर
  • कोलकाताला लागोपाठ दोन धक्के, रिंकू सिंह आणि पियूष चावला माघारी.
  • लागोपाठ नितीश राणा माघारी, कोलकात्याचे ६ गडी बाद
  • कोलकात्याचा निम्मा संघ तंबूत परतला
  • कोलकात्याच्या फलंदाजांची हाराकिरी, चोरटी धाव घेताना दिनेश कार्तिक माघारी
  • हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर आंद्रे रसेल माघारी, कोलकात्याचा चौथा गडी माघारी
  • कोलकात्याने ओलांडला ५० धावांचा टप्पा
  • कोलकात्याचा तिसरा गडी माघारी
  • मयांक मार्कंडेच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात उथप्पा माघारी
  • रॉबिन उथप्पा-नितीश राणा जोडीकडून संघाडा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • चोरटी धाव घेण्याच्या नादात ख्रिस लीन माघारी, कोलकात्याचा दुसरा गडी माघारी
  • रॉबिन उथप्पा- ख्रिस लीन जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • मिचेल मॅक्लेनघनला पहिली विकेट, कोलकात्याला पहिला धक्का
  • कोलकात्याची अडखळती सुरुवात, सुनील नरीन माघारी
  • कोलकात्याला विजयासाठी २११ धावांचं आव्हान
  • २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात मुंबईची २१० धावांपर्यंत मजल
  • पियुष चावलाच्या गोलंदाजीवर कटींग माघारी, मुंबईचा सहावा गडी माघारी
  • अखरेच्या षटकात बेन कटिंगची फटकेबाजी
  • १९ व्या षटकात रोहित शर्मा माघारी, मुंबईचा निम्मा संघ माघारी
  • टॉम कुरनच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्या माघारी, मुंबईचा चौथा गडी माघारी
  • हार्दिक पांड्या – रोहित शर्माकडून मैदानात फटकेबाजी
  • मुंबईचा तिसरा गडी माघारी
  • सुनील नरीनच्या गोलंदाजीवर किशन मोठा फटका खेळण्याच्या नादात माघारी
  • १७ चेंडूत इशान किशनचं अर्धशतक, सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्यांच्या यादीत किशन तिसऱ्या स्थानावर
  • इशान किशनचा आक्रमक पवित्रा, कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर ठोकले सलग ४ चौकार
  • मुंबईने ओलांडला शंभर धावांचा टप्पा, दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी
  • इशान किशन-रोहित शर्मा जोडीकडून जोरदार फटकेबाजी
  • मात्र पियुष चावलाच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादव माघारी, मुंबईला दुसरा धक्का
  • सूर्यकुमार यादव-रोहित शर्माकडून मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • मुंबईने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा
  • मोठा फटका खेळण्याच्या नादात एविन लुईस माघारी, मुंबईचा पहिला गडी माघारी
  • पियुष चावलाच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवचे २ खणखणीत चौकार
  • दोघांकडूनही मैदानात फटकेबाजी
  • सूर्यकुमार यादव-एविन लुईस जोडीची आक्रमक सुरुवात
  • कोलकात्याने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय