भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याची चिन्ह दिसतं नाहीयेत. बायको हसीन जहाँने केलेल्या आरोपांवरुन शमीला क्लिन चीट मिळाली. मात्र त्यानंतर घरगुती हिंसाचारप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीत कोलकाता पोलिसांनी मोहम्मद शमीला समन्स बजावलं आहे. उद्या म्हणजेच बुधवारी शमीला कोलकाता पोलिसांसमोर दाखल व्हावं लागणार आहे.

कोलकाता पोलिसांनी बीसीसीआयला पत्र लिहून, शमीच्या आयपीएलमधील आगामी वेळापत्रकाविषयी माहिती मागवलेली आहे. पत्नी हसीन जहाँने शमीचे अन्य मुलींसोहत अनैतिक संबध असल्याचा आरोप करत, शमीने बुकींकडून पैसे स्विकारल्याचाही आरोप केला होता. मात्र बीसीसीआयच्या भ्रष्ट्राचारविरोधी पथकाने केलेल्या चौकशीत हसीन जहाँच्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य आढळलं नाही. यानंतर बीसीसीआयने शमीचा राखून ठेवलेला करार कायदेशीर पद्धतीने करत त्याला आयपीएलमध्येही खेळण्याची परवानगी दिली.

मात्र यानंतर हसीन जहाँने कोलकाता पोलिसांमध्ये शमीविरोधात कौटुंबिक हिंसाचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन सध्या कोलकाता पोलिस प्रकरणात पुढचा तपास करत आहेत. सध्या मोहम्मद शमी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळतो आहे. आतापर्यंत शमीला गोलंदाजीत फारशी चमक दाखवता आलेली नाहीये, त्यामुळे आयपीएल मधेच सोडून शमीला पोलिसांसमोर हजर व्हावं लागतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.