आयपीएलच्या ११ व्या हंगामात रविवारी मोहाली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पंजाबच्या संघाने नमवत रोमहर्षक विजय मिळवला. क्रिकेट सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत गेलेला सामना खिशात टाकण्यासाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहिने म्हणजेच महेंद्रसिंह धोनीने नेहमीप्रमाणेच अफलातून खेळी केली. पण, त्याची ही खेळी चेन्नईच्या संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. असं असलं तरीही या संघाचं हरणंसुद्धा चाहत्यांनी फारसं मनावर घेतलं नाही. कारण होतं खेळाडूंची अफलातून खेळी.

७९ धावा करत धोनीने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीतील सर्वाधिक धावा करत पंजाबच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. पाठीचं दुखणं असतानाही धोनीचा मैदानातील वावर चाहत्यांची मनं जिंकून गेला. मुख्य म्हणजे सोशल मीडियावरही त्याच्याच चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळालं होतं.

धोनीसोबतच आणखी एका खेळाडूनेसुद्धा नेटकऱ्यांची आणि क्रिडारसिकांची मनं जिंकली. तो खेळाडू म्हणजे युवराज सिंग. सामना सुरु असतेवेळी मध्ये एक असा क्षण आला जेव्हा धोनीच्या वेदना असह्य झाल्या. त्याचवेळी युवराज धोनीपाशी आला आणि त्याने मोठ्या प्रेमाने, आपुलकीच्या भावनेने धोनीच्या डोक्यावर अवघ्या काही क्षणांसाठी हात फिरवला. बस्स….. युवीच्या या एका कृतीने त्याच्या आणि धोनीच्या ‘ब्रोमॅन्स’च्या चर्चांना उधाण आलं.

‘धोनीच्या मदतीसाठी कोण पुढे आलं पाहा…’, ‘चांगले मित्र… नव्हे हे तर एकमेकांचे भाऊच आहेत’, असे ट्विट करत नेटकऱ्यांनी या दोन खेळाडूंच्या ‘ब्रोमॅन्स’ची प्रशंसा केली. दोन वेगळ्या संघांसाठी खेळत असतानाही धोनी आणि युवीच्या नात्यात मात्र काहीच बदल झालेला नाही, असं मतही काही युजर्सनी मांडलं. यावेळी अनेकांनी जुन्या सामन्यांतील त्यांच्या फोटोंचे संदर्भही जोडल्याचं पाहायला मिळालं.