नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा किंग्ज इलेव्हन पंजाबचा निर्णय योग्य ठरला. ख्रिस लीन (७४ धावा) आणि कर्णधार दिनेश कार्तिक (४३ धावा) यांच्या खेळीमुळे १९१ धावांचा डोंगर उभारूनही कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाचा सामना करावा लागला. गेलच्या तडाख्यापासून पाऊसही कोलकाताचा पराभव वाचवू शकला नाही. कोलकाताला आपल्या घरच्या मैदानावर हार पत्कारावी लागली. १९१ धावांचे ओझे घेऊन मैदानात उतरलेल्या ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांनी कोणतीही तमा न बाळगता अक्षरश: धुवांधार फलंदाजी केली. १९१ धावांचे आव्हान १५ षटकाच्या आतच पूर्ण केले जाईल असे वाटत असतानाच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खेळ थांबवावा लागला होता. पाऊस थांबल्यानंतर १३ षटकांत १२५ धावांचे आव्हान देण्यात आले होते. पंजाबने हे आव्हान सहज पार केले. राहुलने अवघ्या २७ चेंडूत ६० धावा केल्या. त्याला सुनील नरिनने बाद केले. राहुलने ९ चौकार आणि २ षटकार ठोकले. तर दुसरीकडे गेलनेही वादळी खेळी केली. तो ६२ धावांवर नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत ६ षटकार व ५ चौकार लगावले. सलग दुसऱ्या सामन्यात गेलने आपला फॉर्म कायम राखला. त्याने षटकार ठोकून संघाचा विजय साकार केला.

 

तत्पूर्वी, कोलकाता संघाने पंजाबसमोर १९२ धावांचे आव्हान दिले. लिनच्या आक्रमक अर्धशतकीय खेळीच्या (७४ धावा) जोरावर आणि त्याला कर्णधार दिनेश कार्तिक (४३ धावा) आणि रॉबिन उथप्पाच्या (३४ धावा) फलंदाजीमुळे पंजाबने १९१ धावा केल्या. कोलकाताकडून टाय आणि स्रनने प्रत्येकी २ तर आश्विन आणि मुजीब उर रहमानने एक-एक गडी टिपला. एक फलंदाज धावबाद झाला. दरम्यान, आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाता अग्रस्थानावर आहे.

 

UPDATES:

  • गेलचेही अर्धशतक पूर्ण, षटकार ठोकून संघाचा विजय साकार
  • लोकेश राहुल ६० धावांवर बाद, नरिनने घेतला बळी
  • पावसामुळे धावांचे आव्हान १३ षटकांत १२५ पर्यंत आणण्यात आले.
  • पावसामुळे खेळात व्यत्यय, खेळ थांबवण्यात आला
  • पंजाबच्या ८.२ षटकांत बिनबाद ९६ धावा. ख्रिस गेल ४९ धावांवर तर लोकेश राहुल ४६ धावांवर नाबाद आहेत.
  • पंजाबच्या सहा षटकांत बिनबाद ७३ धावा
  • पंजाबची धुवांधार सुरूवात, के एल राहूल आणि ख्रिस गेलच्या तडाख्याने कोलकाताच्या गोलंदाजांचे हाल
  • कोलकाता संघाच्या २० षटकांत ७ बाद १९१ धावा. पंजाबला विजयासाठी १९२ धावांची गरज
  • सध्या फॉर्मात असलेला आंद्रे रसेल १० धावांवर तंबूत परतला, बरिंदर स्न्रने केले बाद
  • लीन ४१ चेंडूत ७४ धावा काढून बाद, ४ षटकार, ६ चौकारांची आतषबाजी. राहुलने केले बाद
  • लीनचे आक्रमक अर्धशतक
  • टायच्या गोलंदाजीवर लीनला जीवदान
  • शून्यावर राणा धावबाद, कोलकाताला तिसरा धक्का
  • उथप्पा पाठोपाठ नितीश राणा ही आल्यापावली तंबूत परत
  • टी-२० सामन्यात आश्विनने उथप्पाला पाचव्यांदा बाद केले. उथप्पा ३४ धावांवर बाद
  • फॉर्मात आलेल्या रॉबिन  उथप्पाला बाद करण्यात कर्णधार आश्विनला यश
  • दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या रॉबिन उथप्पाने रेहमानला सलग तीन चौकार ठोकले
  • फिरकीपटू मुजबिर रेहमानच्या पहिल्या आणि संघाच्या दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर नरिन बाद. करूण नायरने त्याचा झेल टिपला. नरिन एका धावेवर बाद
  • सलामीवीरांकडून सावध सुरूवात. पहिल्या षटकांत बिनबाद ५ धावा
  • कोलकाताकडून लिन आणि सुनील नरिन सलामीवीर मैदानात
  •  किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला