कावेरी नदीच्या पाणी वाटपावरुन सध्या तामिळनाडूत निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे चेन्नईत होणारे आयपीएलचे सामने रद्द करण्यात आले आहेत. चेन्नईत होणारे आयपीएलचे सामने आता पुण्याला हलवण्यात आले आहेत. त्यामुळे चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमऐवजी पुण्याचं गहुंजे येथील मैदान हे आता चेन्नईच्या संघाचं उर्वरित सामन्यांसाठी ‘घरचं मैदान’ असणार आहे. या निर्णयामुळे एकीकडे चेन्नईतील सीएसके संघाच्या पाठीराख्यांचा चांगलाच हिरमोड झाला असला तरी पुणेकरांची आणि विशेषतः धोनीच्या आणि सीएसकेच्या पुण्यातील चाहत्यांची लॉटरीच लागली आहे.

कावेरी पाणीवाटपावरुन सध्या तामिळनाडूत राजकारण चांगलेच तापलेले आहे. अनेक राजकीय पक्षांनी आयपीएलच्या सामन्यांना विरोध दर्शवला आहे. चेपॉकच्या मैदानावर पार पडलेल्या चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्याआधीही अनेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मैदानाबाहेर निदर्शने केली होती. त्याचसोबत सामना सुरु असताना तामिळी संघटनेच्या कार्यकर्त्याने चेन्नईच्या संघातील खेळाडूच्या दिशेने बूट फेकून मारला होता. त्यामुळे ही सर्व कारणे लक्षात घेता, चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचे होणारे सामने बाहेरच्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्पॉट फिक्सींग प्रकरणात दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगुन पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला नवीन हंगामात यामुळे धक्का बसला आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नईसाठी यंदाच्या हंगामात चेपॉकच्या मैदानात होणारे सामने अतिशय महत्वाचे मानले जात होते. त्याप्रमाणे कोलकात्याविरोधातला आपला पहिला सामना जिंकत चेन्नईने नवीन हंगामात विजयासाठी आपण सज्ज असल्याचं दाखवून दिलं होतं. मात्र आता चेन्नईतून यंदाच्या हंगामासाठी आयपीएल हद्दपार झाल्यामुळे संघाच्या पाठीराख्यांचा चांगलाच हिरमोड होणार आहे.