06 April 2020

News Flash

IPL 2018 MI vs RCB Live Match Updates: हिटमॅनच्या तडाख्याने मुंबईचा बंगळुरुवर ‘रॉयल’ विजय

आयपीएलच्या ११ व्या मोसमामध्ये पराभवाची हॅटट्रीक करणाऱ्या मुंबई इंडियन्सने अखेर मंगळवारी झालेल्या चौथ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ४६ धावांनी विजय मिळवला.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पराभवाची हॅटट्रीक करणाऱ्या मुंबई इंडियन्सला अखेर सूर सापडला आहे. मंगळवारी झालेल्या चौथ्या सामन्यात मुंबईने बंगळुरुवर ४६ धावांनी ‘रॉयल’ विजय मिळवला. मुंबईने विजयासाठी दिलेल्या २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरुने निर्धारीत २० षटकात आठ बाद १६७ धावा केल्या. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहत पराभव टाळण्याचे आटोकाट प्रयत्न केले. पण त्याची ६२ चेंडूतील नाबाद ९२ धावांची एकाकी झुंज व्यर्थ ठरली. विराटने चौफेर फटकेबाजी करताना सात चौकार आणि चार षटकार ठोकले.

विराटचा अपवाद वगळता बंगळुरुच्या अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली. ए.बी.डिव्हिलियर्स अवघ्या १ रन्सवर बाद झाला. अन्य फलंदाजही फार काही चमक दाखवू शकले नाहीत. मुंबईकडून कुणाल पांडयाने भेदक मारा करत चार षटकात २८ धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तत्पूर्वी मुंबईच्या विजयाचा पाया रचला तो कर्णधार रोहित शर्मा आणि ई. लुईसने.

रोहितला हिटमॅन म्हटले जाते. रोहितने आज वानखेडेवर आपली ओळख सार्थ ठरवणाऱ्या फलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने ५२ चेंडूत ९४ धावा तडकावल्या. यात १० चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. लुईसने ४२ चेंडूत ६५ धावांची तुफानी खेळी केली. त्याने सहा चौकार आणि पाच षटकार लगावले. या दोघांच्या फलंदाजीच्या बळावर मुंबईने बंगळुरुला २१४ धावांचे अवघड लक्ष्य दिले.

 • वॉशिंग्टन सुंदरला ७ धावांवर कुणाल पांडयाने सुर्यकुमार यादवकरवी केले झेलबाद
 • कोरी अँडरसनच्या रुपाने बंगळुरुला चौथा धक्का, शुन्यावर कुणाल पांडयाने केले बाद
 • मनदीप सिंह १६ धावांवर बाद, कुणाल पांडयाच्या गोलंदाजीवर इशान किशनने केले यष्टीचीत
 • बंगळुरुला पहिला धक्का, मिचेल मेक्लॅघननच्या गोलंदाजीवर डी कॉक त्रिफळाचीत
 • विराट-क्विंटन डी कॉक जोडीची आक्रमक सुरुवात
 • २० षटकांत मुंबईची २१३ धावांपर्यंत मजल, बंगळुरुला विजयासाठी २१४ धावांचं आव्हान
 • रोहितचं शतक हुकलं, अखेरच्या षटकात ९४ धावांवर झाला झेलबाद
 • अखेरच्या षटकात रोहितची फटकेबाजी, मुंबईने ओलांडला २०० धावांचा टप्पा
 • मुंबईचा निम्मा संघ माघारी
 • कायरन पोलार्डकडून निराशा, फटकेबाजी करण्याच्या नादात गमावली विकेट
 • मुंबईला चौथा धक्का, कृणाल पांड्या धावचीत होऊन तंबूत माघारी
 • उमेश यादवच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार खेचत साजरं केलं अर्धशतक
 • कर्णधार रोहित शर्माने कृणाल पांड्याच्या सहाय्याने संघाचा डाव सावरला
 • कोरी अँडरसनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात लुईस माघारी, मुंबईला तिसरा धक्का
 • मुंबईची जमलेली जोडी फोडण्यात बंगळुरुच्या गोलंदाजांना यश
 • तिसऱ्या विकेटसाठी शर्मा-लुईसमध्ये शतकी भागीदारी
 • एविन लुईसचं धडाकेबाज अर्धशतक, चहलच्या गोलंदाजीवर षटकार हाणत साजरं केलं अर्धशतक
 • शर्मा-लुईस जोडीने फटकेबाजी करत संघावरचं दडपण हटवलं, मुंबईने पार केला ५० धावांचा टप्पा
 • कर्णधार रोहित शर्मा-एविन लुईस जोडीने मुंबईचा डाव सावरला
 • लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर इशना किशन माघारी, उमेश यादवने उडवला त्रिफळा
 • मुंबईची खराब सुरुवात, पहिल्यााच चेंडूवर सुर्यकुमार यादव त्रिफळाचीत
 • बंगळुरुच्या संघात ३ बदल, मुंबईच्या संघात अकिला धनंजया ऐवजी मिचेल मॅक्लेनघन
 • विराट कोहलीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2018 7:40 pm

Web Title: ipl 2018 mi vs rcb live match updates
टॅग IPL 2018,Mi,Rcb
Next Stories
1 Video: हैदराबादच्या खेळाडूंना फ्लाइटमध्ये असा त्रास देतोय शिखर धवन
2 मोहम्मद शमीला कोलकाता पोलिसांचं समन्स, आयपीएल मध्यावर सोडून हजर व्हावं लागणार?
3 मधल्या फळीतल्या फलंदाजांच्या चुकीच्या फटक्यांमुळे मुंबई इंडियन्सचा पराभव – सुनील गावसकर
Just Now!
X