27 May 2020

News Flash

सचिनच्या वाढदिवशी मुंबईचा लाजिरवाणा पराभव ; अवघ्या ८७ धावांत संघ गारद

हैदराबादने दिलेलं  ११९ धावांचं माफक लक्ष्य घेवून मैदानात उतरलेला मुंबईचा अख्खा संघ अवघ्या ८७ धावांमध्येच गारद झाला. त्यामुळे घरच्या मैदानावर मुंबईच्या संघाला ३१ धावांनी लाजिरवाण्या

हैदराबादने दिलेलं  ११९ धावांचं माफक लक्ष्य घेवून मैदानात उतरलेला मुंबईचा अख्खा संघ अवघ्या ८७ धावांमध्येच गारद झाला. त्यामुळे घरच्या मैदानावर मुंबईच्या संघाला ३१ धावांनी लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. सूर्यकुमार यादव आणि कृणाल पांड्या वगळता मुंबईच्या इतर कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. सूर्यकुमारने  ३४ धावा केल्या तर कृणाल पांड्याने २४ धावांचं योगदान दिलं. हैदराबादकडून सिद्धार्थ कौलने सर्वाधिक तीन गडी बाद केले. राशिद खान आणि बासिल थंपी यांनी प्रत्येकी २ गडी बाद करुन मुंबईचा डाव लवकर गुंडाळण्यात हातभार लावला. शाकिब-अल-हसन, मोहम्मद नबी आणि संदीप शर्मा यांनीही प्रत्येकी एक गडी बाद केला.

त्यापूर्वी, घरच्या मैदानावर खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने पहिल्या डावात सनराईजर्स हैदराबाद संघाच्या डावाला वेसण घातली. मुंबईच्या गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यासमोर हैदराबादचा संघ पुरता कोलमडला. हैदराबादचा एकही फलंदाज आपल्या संघासाठी मोठी भागीदारी रचण्यात अपयशी ठरल्यामुळे एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतण्याचं सत्र सुरुच राहिलं. दडपणाखाली उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करत गतविजेत्या मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबाद संघाचा ११८ धावांत खुर्दा केला. ही यंदाच्या पर्वातील आतापर्यंतची निचांकी धावसंख्या ठरली होती. मात्र मुंबई इंडियन्सने ८७ ही निचांकी धावसंख्या नोंदवली. हैदराबादकडून कर्णधार केन विल्यमसन(२९) आणि युसूफ पठाणचा(२९) अपवाद वगळता सर्व फलंदाज केवळ हजेरीवीर ठरले. मुंबईकडून मिचेल मॅक्लेनघन, हार्दिक पांड्या आणि मयांक मार्कंडे यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्याला मुस्तफिजुर रेहमान आणि जसप्रीत बुमराहने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक-

सनरायजर्स हैदराबाद : १८.४ षटकांत सर्वबाद ११८ (केन विल्यम्सन २९, युसुफ पठाण २९; मयांक मार्कंडे २/१५, हार्दिक पंडय़ा २/२०) विजयी वि. मुंबई इंडियन्स : १८.५ षटकांत सर्व बाद ८७ (सूर्यकुमार यादव ३४, कृणाल पंडय़ा २४; सिद्धार्थ कौल ३/२३, रशीद खान २/११)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2018 7:42 pm

Web Title: ipl 2018 mi vs srh live updates
टॅग IPL 2018,Mi
Next Stories
1 IPL 2018: मुंबई इंडियन्स अजुनही स्पर्धेत पुनरागमन करु शकते – रोहित शर्मा
2 रोमहर्षक सामन्यात पंजाब विजयी, दिल्लीवर 4 धावांनी निसटता विजय
3 VIDEO: सपना चौधरीच्या गाण्यावर ख्रिस गेलचे ठुमके
Just Now!
X