तब्बल ६० सामन्यांच्या रणसंग्रामानंतर, आयपीएलचा अकरावा हंगाम अखेर संपुष्टात आला. मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्याच चेन्नई सुपर किंग्जने सनराईजर्स हैदराबादवर ८ गडी राखून मात केली. आयपीएलमधलं चेन्नईचं हे तिसरं विजेतेपद ठरलं. विजयासाठी हैदराबादने दिलेलं १७९ धावांचं आव्हान चेन्नईने शेन वॉटसनच्या शतकी खेळीच्या आधारावर सहज पूर्ण केलं. चेन्नईच्या अंबाती रायडूने विजयी फटका मारल्यानंतर चेन्नईचा सगळा संघ मैदानात धावत येऊन एकच जल्लोष करायला लागला.

मात्र धोनीन एका प्रगल्भ कर्णधाराप्रमाणे पाठीमागे राहणं पसंत करत सामना संपल्यानंतर सर्वांशी हात मिळवून नंतर आपल्या संघाच्या विजयोत्सवात सहभागी होणं पसंत केलं. दोन वर्षांच्या पुनरागमनानंतर संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा आनंद धोनीच्या चेहऱ्यावर साफ दिसून येत होता. मात्र पारितोषिक वितरणादरम्यान धोनी लगेच बापाच्या भूमिकेत शिरला. वानखेडे मैदानाच्या लॉनवर बागडणाऱ्या झिवाला सांभाळताना धोनीला प्रसारमाध्यमांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केलं. यानंतर धोनीनेही इन्स्टाग्रामवर आपली पत्नी साक्षी, मुलगी झिवा आणि ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर करत, झिवाच्या मागणी आपण पूर्ण केल्याचा उल्लेख केला.

अनुभवी खेळाडूंचा संघ म्हणून ओळख असलेल्या चेन्नईच्या संघाने अंतिम सामन्यात आपलं वर्चस्व कायम राखलं. गोलंदाजीदरम्यान हैदराबादला मोठी धावसंख्या उभारु न देऊन, फलंदाजीतही हैदराबादच्या आक्रमणाची हवा काढून टाकली. विजेतेपद पटाकावल्यानंतर चेन्नईचा संघ आपल्या मुंबईहून चेन्नईला जाणार आहे. चेन्नईत आपल्या समर्थकांसोबत हा विजय साजरा करणार असल्याचं धोनीने सामना संपल्यानंतर सांगितलं.