मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघांची आयपीएलच्या ११ व्या मोसमातली पहिली लढत मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आली. अत्यंत चुरशीच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने मुंबईच्या हातून विजय अक्षरशः हिरावून घेतला. त्यामुळे दोन बलाढ्य संघांमधला चुरशीचा सामना पुन्हा एकदा अनुभवला. शेवटच्या षटकापर्यंत प्रत्येक चेंडूवर काय होईल याची उत्कंठा शिगेला पोहचली होती. ८ गडी बाद होऊनही चेन्नईने सामना खिशात घातला तो ब्राव्होच्या आक्रमक खेळीमुळे. ब्राव्होने ३० चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकार मारून ६८ धावांची खेळी केली, ज्यामुळे मुंबईच्या तोंडून अक्षरशः विजयाचा घास हिसकावून घेतला गेला.

डावाच्या सुरूवातीला वॉटसनने चांगली सुरुवात केली. मात्र तो झेलबाद झाला आणि त्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जची पडझड सुरु झाली. अंबाती रायडूची विकेट मयंक मारकंडेने घेतली. त्यामुळे चेन्नईला आणखी एक झटका बसला. ज्यानंतर सुरेश रैना ४ धावांवर, महेंद्र सिंह धोनी ५ धावांवर, रविंद्र जडेजा १२ धावांवर, दीपक चहार ० धावांवर, हरभजन सिंह ८ धावांवर तर मार्क वुड १ धावेवर आऊट झाले. मुंबईच्या हाती मॅच गेली आहे असे वाटत असतानाच ब्राव्होने अत्यंत आक्रमक खेळी करत कठीण वाटणारे आव्हान सोपे केले आणि मुंबईच्या तोंडून विजयाचा घास हिरावला.

नाणेफेक जिंकल्यावर सर्वात आधी चेन्नई सुपरकिंग्नजने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सची बॅटिंग सुरु झाली. संथ खेळ करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा इ लुईस धावचीत झाला. त्यानंतर रोहित शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र वॉटसनने त्याचा झेल टीपला. त्यानंतर आलेल्या ईशान किशन सूर्यकुमार यादव या दोघांनी ८३ धावांची भागिदारी करत मुंबईचा डाव सावरला. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांनीही चांगली खेळी करत मुंबईची धावसंख्या १६० धावांच्या पुढे जाण्यास हातभार लावला. कृणाल पंड्याची डावातली २२ चेंडूत केलेली ४२ धावांची खेळी निर्णायक ठरली. मात्र चेन्नईवर मात करण्याचे मुंबईचे स्वप्न मात्र अपुरेच राहिले.