गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाचे इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे, तरीही नशिबाच्या जोरावर ते अजूनही बाद फेरीमध्ये स्थान मिळवू शकतात. याच आशेने मैदानात उतरणाऱ्या मुंबईसमोर शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या धडाकेबाज फलंदाजांना रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

सलामीवीरांचे अपयश हे मुंबईसाठी पराभवाचे प्रमुख कारण ठरत आहे. सूर्यकुमार यादव आणि ईविन लेविस यांनी आतापर्यंत संमिश्र कामगिरी केली आहे. शिवाय इशान किशनसुद्धा धावांसाठी झगडत असून त्याच्याऐवजी सिद्धेश लाड किंवा आदित्य तरे या मुंबईकरांना संघ व्यवस्थापन संधी देऊ शकते. विशेष म्हणजे रोहितने कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला यावे, हे अजूनही पक्के झालेले दिसत नाही. किरॉन पोलार्डने यंदाच्या आयपीएलमध्ये सुमार प्रदर्शन केले आहे. त्यामुळेच त्याच्यावर संघाबाहेर बसण्याची नामुष्कीसुद्धा ओढवली होती. गोलंदाजीत मयांक मरकडे वगळता इतरांना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. जसप्रीत बुमराने ठरावीक प्रसंगी संघाला बळी मिळवून दिले आहेत.

दुसरीकडे रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ अनपेक्षितरीत्या सात सामन्यांतून पाच विजयांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. सलामीवीर ख्रिस गेल आणि लोकेश राहुलची तुफानी फटकेबाजी यांना पंजाबच्या विजयाचे मुख्य श्रेय जाते. पंजाबने आतापर्यंत सांघिक कामगिरीच्या बळावर विजय मिळवले आहेत. गोलंदाजीत  फिरकीपटू मुजीब-उर-रहमान सुरेख कामगिरी करत आहे.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स