नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यर आणि सलामीवीर पृथ्वी शॉ या दोन मुंबईकरांच्या तुफानी खेळीच्या जोरावर दिल्लीने कोलकात्यासमोर २२० धावांचं तगडं आव्हान दिलं आणि 55 धावांनी मात करत पराभवाची मालिका संपवली. दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो 40 चेंडूंत 3 चौकार आणि दहा षटकारांसह ९३ धावा फटकावणारा श्रेयस अय्यर. मात्र, २२० धावांचं आव्हान उभारण्यासाठी सर्वात महत्त्वाची ठरली ती म्हणजे १८ वर्षांच्या पृथ्वीची जबरदस्त खेळी. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे मोठी धावसंख्या उभारण्याचा पाया रचला गेला. सलामीला आलेल्या पृथ्वीने सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर हल्ला चढवला. पृथ्वीने दमदार सलामी देताना 44 चेंडूंत 7 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 62 धावा केल्या.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याच्या गोलंदाजीवर पृथ्वीने विशेष हल्ला चढवला. जॉन्सनच्या पहिल्याच षटकात पृथ्वीने त्याला एक चौकार लगावला होता. त्यानंतर संघासाठी ९ वं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यास जॉन्सन पुन्हा आला. चौथ्या चेंडूवर लेग साइडच्या दिशेने फ्लिक करुन शॉने पुन्हा चौकार मारला. पण त्याच्या पुढच्याच चेंडूवर जे काही पृथ्वीने केलं त्यामुळे प्रेक्षकांसह समालोचक देखील अवाक झाले. जॉन्सनने पृथ्वीच्या मिडल स्टंपला लक्ष्य करत फुल लेंथ बॉल टाकला. पण, खेळपट्टीचा वापर करत थोडा मागे जाऊन पृथ्वीने मनगटाच्या सहाय्याने चेंडूवर जोरदार प्रहार केला आणि चेंडू थेट सीमारेषेपार गेला. त्याचा हा शॉट धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटसोबत इतका मिळताजुळता होता की समालोचकही त्याला छोटा धोनी संबोधण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. हा शॉट पाहून  सोशल मीडियावरही अनेकांनी धोनीची आठवण झाल्याचं म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ –