27 February 2021

News Flash

या ५ कारणांमुळे पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स पराभूत

अखेरच्या षटकांत ब्राव्होने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईने सामना गमावला

हातातोंडाशी आलेला विजय निसटल्यामुळे हताश झालेला मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा

आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात, गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून पुनरागमन केलेल्या चेन्नई सुपर किंग्जने मुंबईवर शेवटच्या षटकात सनसनाटी विजय नोंदवत, नवीन हंगामाची सुरुवात विजयाने केली. ड्वेन ब्राव्होने केलेली फटकेबाजी आणि दुखापतग्रस्त केदार जाधवच्या खेळीमुळे चेन्नईला या सामन्यात विजय मिळवता आला.

मुंबईकडूम इशान किशन, सुर्यकुमार यादव यांनी आपल्या संघाच्या डावाला चांगला आकार दिला. दोघांनीही चेन्नईच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. गोलंदाजीत नवोदीत मयांक मार्कंडेने ३ बळी घेत आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवली. मात्र ब्राव्होने केलेल्या फटकेबाजीमुळे या सामन्याचं चित्रच पालटलं. सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला नेमका कोणत्या कारणांमुळे पराभव स्विकारवा लागला याची कारणमिमांसा जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.

५. अखेरच्या षटकांमध्ये मुंबईची स्वैर गोलंदाजी

अकराव्या हंगामाच्या लिलावात मुंबईने जास्तीत जास्त गोलंदाज घेण्याकडे भर दिला होता. मात्र पहिल्या सामन्यात अखेरच्या षटकांमध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली नाही. मिचेल मॅक्लेघेनन, जसप्रीत बुमराह, मुस्तफिजुर रेहमान यांच्यासारखे दिग्गज गोलंदाज असूनही चेन्नईविरुद्ध सामन्यात अखेरच्या ३ षटकांमध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी ४७ धावांची खैरात केली. या स्वैर गोलंदाजीचा फायदा घेत चेन्नईने सामना आपल्या खिशात घातला.

४. चेन्नईकडून ब्राव्होचा अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून मारा

एकीकडे मुंबईचे गोलंदाज अखेरच्या षटकांमध्ये अपयशी ठरलेले असता, चेन्नईकडून ब्राव्होने पहिल्या डावांमध्ये अखेरच्या षटकांत टिच्चून मारा केला. ब्राव्होने अखेरच्या षटकांमध्ये मुंबईच्या फलंदाजांना हात मोकळे करण्याची संधी दिली नाही. पहिल्या षटकात १४ धावा देणाऱ्या ब्राव्होने अखेरच्या ३ षटकांमध्ये ११ धावा देत जोरदार पुनरागमन केलं. ब्राव्होच्या या गोलंदाजीमुळे मुंबईला १६५ धावांवर समाधान मानावं लागलं.

३. कृणाल चमकला, हार्दिक पांड्या फलंदाजीत अपयशी

सुर्यकुमार माघारी परतल्यानंतर हार्दिक पांड्या मैदानात आला. मार्क वुडच्या गोलंदाजीवर लागोपाठ २ चौकार लगावत हार्दिकने चांगली सुरुवात केली. मात्र यानंतर हार्दिकला फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नाही. हार्दिकने २० चेंडूत अवघ्या २२ धावा केल्या. ड्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर पांड्याला धावा काढणं जमलं नाही, ज्यामुळे मुंबईला १६५ धावांवर समाधान मानावं लागलं.

२. मुंबईची फलंदाजीत खराब सुरुवात

पहिल्या सामन्यात चेन्नईच्या संघाने नाणेफेक जिंकत सर्वात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र एविन लुईस आणि रोहित शर्मा जोडी स्वस्तात माघारी परतली. अवघ्या २० धावांमध्ये मुंबईची सलामीची जोडी माघारी परतल्यामुळे, संघाला आश्वासक सुरुवात करता आली नाही.

१. चॅम्पियन ब्राव्होची आक्रमक खेळी

मुंबईच्या मयांक मार्कंडेने चेन्नईच्या आघाडीच्या फळीला माघारी धाडत, सामन्यावर आपली पकड बसवली. चेन्नईचा निम्मा संघ माघारी परतल्यानंतर ड्वेन ब्राव्हो मैदानात आला. यावेळी चेन्नईला विजयासाठी ८ षटकांमध्ये ९१ धावांची गरज होती. मात्र यानंतर ब्राव्होने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत मुंबईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. ब्राव्होच्या या वादळी खेळीमुळे हातात आलेला विजय मुंबईच्या हातून निसटला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 2:04 pm

Web Title: ipl 2018 probable 5 reasons of mumbai indians defeat in first match
टॅग : Csk,IPL 2018,Mi
Next Stories
1 डीजे.. ब्राव्हो.. डीजे… ब्राव्हो….
2 IPL 2018 live update : चेन्नईच्या संघापुढे मुंबईने ठेवले १६६ धावांचे आव्हान
3 IPL 2018: आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात तारे-तारकांचा जलवा
Just Now!
X