महेंद्रसिंग धोनीने ३४ चेंडूत ७ षटकारांची आतषबाजी करत फटकावलेल्या नाबाद ७० धावा आणि ५३ चेंडूत ८२ धावांची दमदार खेळी करणारा अंबाती रायडू यांच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला.  सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि एबी डिव्हीलियर्स यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आपल्या घरच्या मैदानावर धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, २०६ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या संघाने धोनी आणि रायडूच्या खेळीमुळे २ चेंडू आणि ५ गडी राखून विजय मिळवला.  दोघांनी पाचव्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयात मोलाची भूमिका वठवली.

बेंगळूरुच्या २०६ धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईचा प्रारंभ काहीसा अडखळतच झाला. अष्टपैलू शेन वॉटसन अवघ्या ७, तर सुरेश रैना अवघ्या ११ धावा करुन तंबूत परतले. मात्र दुसरीकडे सलामीवीर रायडूने एक बाजू लावून धरत चेन्नईचा पाया उभरण्यात योगदान दिले. त्यानंतर आलेल्या सॅम बिलिंग्ज आणि रवींद्र जडेजा यांनीदेखील झटपट विकेट फेकल्याने चेन्नईची अवस्था ४ बाद ७४ अशी झाली. मात्र, त्यानंतर कर्णधार धोनी आणि रायडूने आक्रमक भागीदारी रचत संघाला विजयाची आस दाखवली. या भागीदारीत रायडूने तब्बल ८ षटकार आणि ३ चौकारांची आतषबाजी करत ५३ चेंडूत ८२ धावा केल्या. मात्र १७ व्या षटकात तो धावबाद झाला. रायडूचा उंच उडालेला झेल ज्याच्याकडून सुटला त्याच उमेश यादवने रायडूला थेट फेकीवर धावबाद केले. धोनीने अवघ्या ३४ चेंडूत ७०धावांची तुफानी खेळी केली. अखेरच्या दोन षटकांमध्ये चेन्नईला विजयासाठी ३० धावांची गरज होती. सिराजच्या १९ व्या षटकात १४ धावा निघाल्याने अखेरच्या ६ चेंडूत विजयासाठी १६ धावा अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर पहिल्याच चेंडूवर बाय चार तर दुसऱ्या चेंडूवर ब्राव्होने षटकार मारला. त्यानंतर पुन्हा धोनीने षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला.

त्याआधी पहिल्या डावात फलंदाजी करताना बेंगळूरुने अत्यंत आक्रमक सुरुवात केली. डीकॉक आणि कोहलीने काही आक्रमक फटके लगावले. १५ चेंडूत १८ धावांची उपयुक्त खेळी करुन कोहली माघारी परतला. त्यानंतर आलेल्या डि’ व्हिलीयर्स आणि डी कॉक जोडीने तडाखेबंद भागीदारी रचण्यास प्रारंभ केला. डि’ व्हीलीयर्सने तर अवघ्या ३० चेंडूत ६८ धावांची अजून एक तुफानी खेळी केली. तर डिकॉकनेदेखील ३७ चेंडूंमध्ये ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी अवघ्या ९ षटकांमध्ये तब्बल १०३ धावांची भागीदारी रचली. १५ व्या षटकात संघाच्या १३८ धावसंख्येवर डी कॉक आणि त्यानंतर अवघ्या ४ धावांची भर घालत डिव्हीलीयर्स हे लागोपाठ माघारी परतले. त्यामुळे बेंगळूरुच्या धावगतीला काहीसा आळा बसला. त्यानंतर मनदीपसिगने १७ चेंडूत ३२ तर वॉशिंग्टन सुंदर याने अखेरच्या टप्प्यात अवघ्या ४ चेंडूत १३ धावा जमवत संघाला दोनशेच्या पल्याड पोहोचवण्यात यश मिळवले.

संक्षिप्त धावफलक-

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : ८ बाद २०५ (एबी डि’व्हीलियर्स ६८, क्विंटन डी कॉक ५३, मनदीप सिंग ३२; ड्वेन ब्राव्हो २/३३, इम्रान ताहीर २/३५, शार्दूल ठाकूर २/४६) वि. वि. चेन्नई सुपर किंग्ज : १९.४ षटकांत ५ बाद २०७ (अंबाती रायडू ८२, महेंद्रसिंग धोनी नाबाद ७०)