बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज आयपीएलच्या दोन ‘रॉयल’ संघांदरम्यान लढत रंगली. अजिंक्य रहाणेच्या राजस्थान संघाने विराट कोहलीच्या बंगळुरू संघाचा 19 धावांनी पराभव केला. राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे युवा फलंदाज संजू सॅमसन. संजू सॅमसनच्या नाबाद ४५ चेंडूत ९२ धावांच्या धडाकेबाज खेळीमुळेच अजिंक्य रहाणेच्या राजस्थान संघाने विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला 218 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण विराट कोहली, डिव्हिलिअर्स यांच्यासारख्या दिग्गज फलंदाजांचा भरणा असलेल्या बंगळुरू संघाला हे आव्हान पेलवलं नाही. संजूच्या तुफानी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने यंदाच्या हंगामातील 217 ही सर्वोच्च धावसंख्या गाठली.
कर्णधार कोहलीने 30 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर दमदार 57 धावा केल्या. राजस्थानच्या गोलंदाजीवर तुटून पडत बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने 26 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना श्रेयस गोपालला मोठा फटका मारण्याच्या नादात कोहलीने आपली विकेट गमावली. त्यानंतर विराट कोहलीला बाद करणाऱ्या श्रेयस गोपालनेच बंगळुरुच्या एबी डी’व्हिलियर्सचाही काटा काढला आणि बंगळुरू संघाच्या उरल्यासुरल्या आशाही मावळल्या. या सामन्यात मिळालेल्या तीन जीवदानांचा फायदा डिव्हिलियर्सला उचलता आला नाही, त्याने 20 धावा केल्या. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने 19 चेंडूंत 35 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. इतर फलंदाजांनीही टक्कर देण्याचा प्रयत्न केला पण अखेरीस १९ धावांनी त्यांचा पराभव झाला. राजस्थानचा हा सलग दुसरा विजय ठरला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 15, 2018 7:31 pm