आयपीएलच्या अकराव्या हंगामात सनराईजर्स हैदराबाद संघाने पुन्हा एकदा कमी धावसंख्या करुनही सामना कसा जिंकायचा याचा वस्तुपाठ दाखवून दिला. जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर खेळताना हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर ११ धावांनी मात केली. सिद्धार्थ कौल, बसिल थम्पी आणि राशिद खान या गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यासमोर राजस्थानच्या संघाला हैदराबादले दिलेलं १५२ धावांचं आव्हान पेलवता आलं नाही. राजस्थानकडून अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसनचा अपवाद वगळता सर्व फलंदाजांकडून निराशा झाली.

त्याआधी हैदराबादच्या फलंदाजांनाही फारशी चमक दाखवता आलेली नव्हती. अखेरच्या षटकांत राजस्थानच्या गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या माऱ्यामुळे सनराईजर्स हैदराबादचा संघ पुन्हा एकदा ढेपाळला. कर्णधार केन विल्यमसन व सलामीवीर अॅलेक्स हेल्स यांच्यात झालेल्या ९२ धावांच्या भागीदारीनंतर सर्व फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिल्यामुळे हैदराबादला २० षटकांत १५१ धावांपर्यंत मजल मारता आली. शिखर धवन माघारी परतल्यानंतर कर्णधार विल्यमसन आणि हेल्स जोडीने संघाचा डाव सावरला होता. हे दोन्ही फलंदाज मैदानात असताना हैदराबादचा संघ आज मोठी धावसंख्या उभारेल असा अंदाज सर्वांनीच व्यक्त केला होता. मात्र जोफ्रा आर्चरच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. त्यामुळे एका क्षणापर्यंत १८०-२०० धावसंख्या गाठु शकणारा हैदराबादचा डाव १५१ धावांमध्ये आटोपला.

राजस्थानच्या गोलंदाजांनी सामन्यात दमदार पुनरागमन करत हैदराबादच्या फलंदाजांना वेसण घातली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने ३ तर कृष्णप्पा गौथमने २ बळी घेतले. या दोघांना जयदेव उनाडकट आणि इश सोधी यांनी प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

  • राजस्थान रॉयल्सवर ११ धावांनी केली मात
  • सलग तिसऱ्या सामन्यात कमी धावसंख्या राखण्यात हैदराबाज विजयी
  • अखेरच्या षटकात पाचव्या चेंडूवर कृष्णप्पा गौथम बाद, राजस्थानचा सहावा गडी माघारी
  • मोक्याच्या क्षणी राजस्थानचा निम्मा संघ माघारी
  • अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करणाऱ्याच्या नादात महिपाल लामोर माघारी
  • कर्णधार अजिंक्य रहाणेचं अर्धशतक
  • राशिद खानच्या गोलंदाजीवर जोस बटलर माघारी, राजस्थानला चौथा धक्का
  • अजिंक्य रहाणे-जोस बटलर जोडीचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • राजस्थान रॉयल्सचा तिसरा गडी माघारी, हैदराबादचं पुनरागमन
  • ठराविक अंतराने बेन स्टोक्स माघारी, युसूफ पठाणने उडवला त्रिफळा
  • राजस्थानची जमलेली जोडी फुटली, संजू सॅमसन सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर माघारी
  • दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी
  • संजू सॅमसन- अजिंक्य रहाणे जोडीने राजस्थानचा डाव सावरला
  • संदीप शर्माने उडवला राहुलचा त्रिफळा, राजस्थानचा पहिला गडी माघारी
  • राजस्थानच्या डावाची अडखळती सुरुवात, राहुल त्रिपाठी माघारी
  • २० षटकांत हैदराबादची १५१ धावांपर्यंत मजल, राजस्थानला विजयासाठी १५२ धावांचं आव्हान
  • अखेरच्या षटकांत हैदराबादची घसरगुंडी, सातवा गडी माघारी
  • अखेरच्या षटकात जोफ्रा आर्चरला आणखी एक यश, राशिद खान माघारी
  • मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मनिष पांडे माघारी, हैदराबादला सहावा धक्का
  • ठराविक अंतराने युसूफ पठाण माघारी, जोफ्रा आर्चरचा भेदक मारा. हैदराबादचे ५ गडी माघारी
  • ठराविक अंतराने शाकीब अल हसन जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बाद, हैदराबादला चौथा धक्का
  • केन विल्यमसनच्या ६३ धावा, हैदराबादचे ३ गडी माघारी
  • ठराविक अंतराने केन विल्यमसन माघारी, इश सोधीला मिळाली विकेट
  • कृष्णप्पा गौथमच्या गोलंदाजीवर हेल्स बाद, हैदराबादला दुसरा धक्का
  • दुसऱ्या विकेटसाठी हेल्स – विल्यमसन जोडीमध्ये ९२ धावांची भागीदारी
  • कर्णधार केन विल्यमसनने पूर्ण केलं अर्धशतक, हैदराबादने ओलांडला १०० धावांचा टप्पा
  • विल्यमसनचा आक्रमक पवित्रा, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी
  • अॅलेक्स हेल्स – केन विल्यमसन जोडीने हैदराबादचा डाव सावरला
  • तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हैदराबादला पहिला धक्का, शिखर धवन माघारी
  • पहिल्या दोन षटकांमध्ये हैदराबादकडून सावध सुरुवात
  • हैदराबादने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय