कर्णधार केन विल्यमसन आणि युसूफ पठाण यांनी केलेली फटकेबाजी, याचसोबत राशिद खानने शेवटच्या षटकात ब्राव्होवर केलेला हल्लाबोल या जोरावर सनराईजर्स हैदराबादने घरच्या मैदानावर खेळताना चेन्नईच्या संघाला चांगलीच लढत दिली. मात्र अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ६ धावांची आवश्यकता असताना राशिद खानला मोठा फटका खेळता आला नाही, आणि अखेर चेन्नईने सामन्यात ४ धावांनी विजय मिळवला. १८३ धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अडखळती झाली होती. दिपक चहरच्या गोलंदाजीवर हैदराबादचे बिनीचे ३ शिलेदार स्वस्तात माघारी परतले. मात्र कर्णधार केन विल्यमसनने युसूफ पठाणच्या साथीने ७९ धावांची भागीदारी करत आपल्या संघाचं सामन्याचं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.

चेन्नईकडून दिपक चहरने ४ षटकात १५ धावां देत ३ बळी घेतले. त्याला शार्दुल ठाकूर, कर्ण शर्मा आणि ड्वेन ब्राव्होने प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली. त्याआधी अंबाती रायडू आणि सुरेश रैना यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने सनराईजर्स हैदराबाद संघासमोर विजयासाठी १८३ धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या हैदराबादच्या संघाने सुरुवातीच्या काही षटकांमध्ये चेन्नईच्या फलंदाजांना चांगलचं बांधून ठेवलं. मात्र सलामीवीर फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसन माघारी परतल्यानंतर सुरेश रैना आणि अंबाती रायडू जोडीने डावाची सुत्र आपल्या हाती घेतली. रैना-रायडूमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ११२ धावांची शतकी भागीदारी झाली. दोघांनीही चौफेर फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. या शतकी भागीदारीत दोन्ही खेळाडूंनी अर्धशतकी खेळी केली.

  • अखेरच्या षटकात राशिद खानची फटकेबाजी, मात्र चेन्नईची हैदराबादवर ४ धावांनी मात
  • शार्दुल ठाकूरला मिळाली विकेट, हैदराबादचा सहावा गडी माघारी
  • फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात युसूफ पठाण १९ व्या षटकात माघारी
  • ब्राव्होने हैदराबादची जमलेली जोडी फोडली, कर्णधार केन विल्यमसन माघारी
  • दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी, विल्यमसन-पठाणची फटकेबाजी
  • युसूफ पठाण-केन विल्यमसन जोडीने संघाचा डाव सावरला
  • कर्णधार केन विल्यमसनचं अर्धशतक
  • फिरकीपटू कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर शाकीब अल हसन माघारी, हैदराबादला चौथा धक्का
  • दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी
  • शाकिब अल हसन – केन विल्यमसन जोडीने हैदराबादचा डाव सावरला
  • हैदराबादचा तिसरा गडी माघारी, दिपक चहरचे सामन्यात आतापर्यंत ३ बळी
  • हैदराबादची घसरगुंडी सुरुच, दिपक चहरच्या गोलंदाजीवर दिपक हुडा माघारी
  • दिपक चहरच्या दुसऱ्याच षटकात मनिष पांडे माघारी, हैदराबादला दुसरा धक्का
  • हैदराबादची अडखळती सुरुवात, रिकी भुई भोपळाही न फोडता माघारी
  • २० षटकात चेन्नईची १८२ धावसंख्येपर्यंत मजल, हैदराबादला विजयासाठी १८३ धावांचं आव्हान
  • अखेरच्या षटकांमध्ये सुरेश रैनाचं आक्रमक अर्धशतक
  • धोनीच्या सहाय्याने सुरेश रैनाची फटकेबाजी सुरुच
  • चोरटी धाव घेण्याच्या नादात अंबाती रायडू माघारी
  • रायडू-रैना जोडीमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी
  • अंबाती रायडूचं धडाकेबाड अर्धशतक
  • अंबाती रायडू – सुरेश रैना जोडीने चेन्नईचा डाव सावरला
  • १० व्या षटकात चेन्नईच्या ५० धावा पूर्ण
  • चेन्नईला दुसरा धक्का, हैदराबादच्या गोलंदाजांचं सामन्यावर वर्चस्व
  • फाफ डु प्लेसिसकडूनही निराशा, राशिद खानच्या गोलंदाजीवर झाला यष्टीचीत
  • भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर हुडाने पकडला झेल
  • चेन्नईला पहिला धक्का, मागच्या सामन्यातील शतकवीर शेन वॉटसन माघारी
  • चेन्नईच्या संघाची सावध सुरुवात, हैदराबादच्या गोलंदाजांचा टिच्चून मारा
  • शिखर धवन ऐवजी रिकी भुईला संघात  स्थान
  • हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय