21 February 2019

News Flash

IPL 2018 – धोनीसाठी सुरेश रैनानं केला मोठा त्याग, प्रेक्षकांकडून कौतुक

रैनाने विजयी फटका खेळण्याची संधी आपला कर्णधार धोनीला दिली.

सुरेश रैना- महेंद्रसिंह धोनी जोडीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं

रविवारी आयपीएलच्या अखेरच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला. आपल्या घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जने चाहत्यांसाठी शेवटचा सामना जिंकत प्ले-ऑफसाठी आपण सज्ज असल्याचं दाखवून दिलं. रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नईकडून सुरेश रैनाने ४८ चेंडुत नाबाद ६१ धावांची खेळी केली. मात्र या सामन्यादरम्यान सुरेश रैनाच्या एका कृतीमुळे त्याची सध्या वाहवा होत आहे.

अवश्य वाचा – धोनीने रचला नवा विक्रम पण दिनेश कार्तिककडून धोका

पंजाबविरुद्ध विजय मिळवण्यासाठी चेन्नईला अखेरच्या काही षटकांमध्ये मोठ्या धावांची गरज होती. पंजाबकडून यंदाच्या हंगामात सर्वाधिक बळी घेणारा अँड्रू टाय गोलंदाजी करत होता. यावेळी स्ट्राईकवर असणाऱ्या सुरेश रैनाने फटकेबाजी करत आपल्या संघाला विजयाच्या जवळ आणून ठेवलं. टायच्या पहिल्या ५ चेंडूंवर रैनाने दोन षटकार आणि दोन चौकार लगावले. अखेरच्या चेंडूवर सुरेश रैना धाव घेऊन आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकत होता. मात्र असं न करता रैनाने विजयी फटका खेळण्याची संधी आपला कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिली.

पुढच्याच षटकात कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मोहीत शर्माच्या गोलंदाजीवर षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या सामन्यात चेन्नईने ५ गडी राखून पंजाबवर मात केली. ज्या कारणासाठी धोनी टी-२० क्रिकेटमध्ये ओळखला जातो, त्याच प्रकारे उत्तुंग फटका खेळल्याने उपस्थित प्रेक्षकांनीही एकच जल्लोष केला. दरम्यान रैनाच्या या वागणुकीबद्दल सोशल मीडियावरही त्याचं कौतुक होताना दिसलं.

First Published on May 21, 2018 3:26 pm

Web Title: ipl 2018 suresh raina make sacrifice for his captain offer winning shot to ms dhoni