२३ चेंडूत ५६ धावांची वादळी खेळी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जच्या सॅम बिलींग्जमुळे, कोलकात्याने दिलेलं २०३ धावांचं आव्हान पार करत चेन्नईने स्पर्धेतला सलग दुसरा विजय नोंदवला. बिलींग्जने कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबत ५४ धावांची भागीदारी रचत आपल्या संघाच्या विजयासाठी पायाभरणी केली. सामना संपल्यानंतर पारितोषीक वितरण सोहळ्यात सॅम बिलींग्जने कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे आभार मानले.

“मैदानात खेळत असताना धोनीने मला कोणत्याही प्रकारे सूचना केल्या नाहीत. आमच्यासाठी धावा काढून बॉल वाया जाऊ न देणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. धोनी मैदानात खरचं खूप शांत असतो. त्यामुळे त्याच्यासोबत फलंदाजी करत असताना तुमच्याकडूनही आपसून त्याच्या तोडीचा खेळ होतो.” सॅम बिलींग्जने धोनीच्या खेळाचं कौतुक केलं.

याचसोबत भारताचा माजी फलंदाज आणि आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मार्गदर्शक विरेंद्र सेहवागनेही बिलींग्जच्या खेळाचं कौतुक केलं. घरच्या मैदानावर खेळताना आपली खेळी विजयासाठी कारणीभूत ठरत असेल तर यासारखी अभिमानाची गोष्ट कोणत्याही खेळाडूसाठी नाही. सध्या दोन विजयांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.