आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी फारशी चांगली होऊ शकलेली नाही. त्यांनी खेळलेल्या १० सामन्यांपैकी तब्बल ६ सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. असे असूनही मुंबईचे संघ व्यवस्थापन आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडून एका सक्षम खेळाडूला सातत्याने डावलले जात आहे. भारताच्या संघाचे प्रतिनिधित्व केले असूनही या खेळाडूकडे दुर्लक्ष केले जात आहे.

मुंबई इंडियन्सने खेळलेल्या एकही सामन्यात सौरभ तिवारीला संधी देण्यात आलेली नाही. मुंबईच्या संघाने लिलावाच्या वेळी सौरभला ८० लाख देऊन खरेदी केले. पण त्याला अद्याप एकाही सामन्यात खेळवण्यात आलेले नाही.

वास्तविक पाहता, सौरभ या आधीही आयपीएल २०१०मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळलेला आहे. त्या हंगामात त्याने २९.९२ च्या सरासरीने आणि १३५च्या स्ट्राईक रेटने खेळत ४१९ धावा केल्या होत्या. याशिवाय, त्याने बंगळुरू, दिल्ली आणि पुणे संघाकडूनही आयपीएल खेळले असून त्याची आयपीएलची कारकीर्द उल्लेखनीय आहे. त्याने एकूण ८१ सामने खेळले असून त्यात २८.३५च्या सरासरीने १२७६ धावा केल्या आहेत. तसेच ११९च्या स्ट्राईक रेटने खेळत ७ अर्धशतके झळकावली आहेत.

आयपीएलमधील आपल्या कामगिरीच्या जोरावर सौरभला भारतीय संघात स्थान मिळाले होते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३ वनडे सामन्यात ४९ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो कधीही बाद झालेला नाही.