29 March 2020

News Flash

IPL 2018 KKR vs SRH : कोलकाता बाद फेरीत

प्रसिध कृष्णा आणि ख्रिस लिन विजयाचे शिल्पकार

प्रसिध कृष्णा आणि ख्रिस लिन विजयाचे शिल्पकार

युवा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने केलेली सुरेख गोलंदाजी व ख्रिस लिनच्या अर्धशतकाच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्स संघाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सनरायझर्स हैदराबादवर दोन चेंडू आणि पाच विकेट राखून मात केली. या विजयासह कोलकात्याने बाद फेरीतील स्थान पक्के केले असून, त्यांनी गुणतालिकेतील तिसरे स्थान कायम राखले आहे. हैदराबादने दिलेले १७३ धावांचे लक्ष्य कोलकात्याने १९.४ षटकांत पाच फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने धडाक्यात सुरुवात केली. अ‍ॅलेक्स हेल्सच्या जागी संधी मिळालेल्या श्रीवत्स गोस्वामीने फटकेबाजी करत २६ चेंडूंत ३५ धावा फटकावल्या. शिखर धवनसोबत त्याने ८.४ षटकांत ७९ धावांची सलामी दिली. धवनने ३९ चेंडूंत पाच चौकार व एका षटकारासह ५० धावा केल्या. कुलदीप यादवने गोस्वामीला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर कर्णधार केन विल्यम्सनने तीन षटकारांच्या मदतीने ३६ धावा चोपल्या. मात्र धवनला बाद करत कृष्णाने धावगतीवर लगाम घातला. पुढच्याच षटकांत विल्यम्सनही (३६ धावा) बाद झाल्यामुळे हैदराबादचा डाव घसरला.  कृष्णाने शेवटच्या षटकात तीन फलंदाजांना माघारी धाडले.

हैदराबादच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुनील नरिन व लिनने नेहमीप्रमाणे धडाकेबाज फलंदाजी करत अवघ्या चौथ्या षटकात संघाचे अर्धशतक फलकावर लावले. १० चेंडूंत चार चौकार व दोन षटकारांसह २९ धावा काढणारा नरिन शकिब अल हसनचा शिकार ठरला. मात्र लिनने रॉबिन उथप्पाच्या साथीने फटकेबाजी चालू ठेवत ३६ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. ५५ धावा करून लिन बाद झाला. पुढे कर्णधार दिनेश कार्तिकने जबाबदारीने फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला व दिमाखात बाद फेरी गाठली.

संक्षिप्त धावफलक

सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ९ बाद १७२ (शिखर धवन ५०, केन विल्यम्सन ३६; प्रसिध कृष्णा ४/३०) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १९.४ षटकांत ५ बाद १७३ धावा ( ख्रिस लिन ५५, रॉबिन उथप्पा ४५; सिद्धार्थ कौल २/२६).

एका स्थानासाठी तीन संघ शर्यतीत

  • सनरायझर्स हैदराबाद (१४ सामन्यांत १८ गुण), चेन्नई सुपर किंग्ज (१३ सामन्यांत १६ गुण) आणि कोलकाता नाइट रायडर्स (१४ सामन्यांत १६ गुण) या तीन संघांनी बाद फेरीतील स्थान निश्चित केले आहे.
  • उर्वरित एका स्थानासाठी मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हे तीन संघ शर्यतीत आहेत.
  • राजस्थानच्या खात्यावर १४ गुण असले तरी मुंबई (१३ सामन्यांत १२ गुण) आणि पंजाब (१३ सामन्यांत १२ गुण) या दोघांनाही १४ गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. त्यामुळे विजयासह सरस निव्वळ धावगती ही महत्त्वाची ठरणार आहे.
  • रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2018 7:52 pm

Web Title: ipl kolkata night riders vs sunriser hyderabad
टॅग Ipl
Next Stories
1 IPL 2018 RR vs RCB : राजस्थान अजिंक्य, बंगळुरुचे IPL मधील आव्हान संपुष्टात
2 Video : IPL 2018 – … आणि टॉसच्या वेळी धोनी खो खो हसू लागला
3 IPL 2018 – ‘करो या मरो’च्या सामन्यात बंगळुरूला पराभूत करण्यासाठी राजस्थानचा ‘मास्टर प्लॅन’
Just Now!
X