आयपीएल सामन्यांमध्ये भारतीय पंचांना अम्पायरिंग करण्याची अधिकाधिक संधी मिळावी म्हणून ‘बीसीसीआय’ने परदेशी पंचांची संख्या कमी केली. मात्र बीसीसीआयच्या या निर्णयामुळे आयपीएललाच फटका बसला आहे. गेल्या हंगामाप्रमाणेच या हंगामातही भारतीय पंचाकडून होणाऱ्या चुका आणि चुकीचे निर्णय यात भर पडत असून ‘बीसीसीआय’ला क्रिकेटरसिकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.

आयपीएलच्या १०व्या हंगामात म्हणजेच आयपीएल २०१७मध्ये पंचाकडून २५ हून अधिक चुकीचे निर्णय देण्यात आले होते. त्यापैकी काही निर्णय हे अत्यंत बाळबोध होते आणि या चुकीच्या निर्णयाचा अनेकदा सामन्याच्या निकालावर परिणाम झाला होता. चुकीच्या निर्णयांचा हाच सिलसिला पंचांनी यंदाच्या हंगामातही सुरु ठेवला आहे आणि त्यामुळे विविध माध्यमातून आयपीएलमधील पंचांवर टीका केली जात आहे.

आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे परदेशी पंच मोठ्या प्रमाणावर दिसत होते. पण ज्याप्रमाणे देशातील खेळाडूंना संधी मिळावी म्हणून आयपीएलचा वापर केला जातो आहे. त्याप्रमाणेच देशातील पंचांनाही संधी देण्याचा हा एक चांगला पर्याय आहे, असा विचार करून बीसीसीआयने परदेशी पंचांची संख्या कमी केली. मात्र हा त्यांचा निर्णय त्यांच्याच टीकेचा विषय ठरला आहे.

आता सुरु असलेल्या हंगामात चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील दुसऱ्या सामन्यात चेन्नईचा फलंदाज शेन व्हॉटसन याचा एलबीडब्ल्यूचा निर्णय वादात राहिला. हैदराबाद आणि चेन्नईच्या संघात झालेल्या सामन्यातही पंच विनीत कुलकर्णी यांनी चुकीचा निर्णय दिल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले. शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सन खेळत असताना शार्दुलने टाकलेला चेंडू हा कमरेच्या वरच्या उंचीवर होता. मात्र तो नो बॉल देण्यात आला नाही आणि तो सामना हैदराबादने या अत्यल्प फरकाने गमावला. तो चेंडू जर नो बॉल देण्यात आला असता, तर सामन्याचा निकाल काहीसा वेगळा लागू शकला असता.

याशिवाय, पंजाब आणि कोलकाता यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात गोलंदाज अँड्र्यू टायचा एक चेंडू पंचांनी नो बॉल दिला. मात्र तो चेंडू नो बॉल नव्हता, हे स्पष्टपणे दिसत होते. तर दुसरीकडे कोलकाता आणि हैदराबाद यांच्या सामन्यात चेंडू बॅटला लागून गेलेला दिसत असतानाही पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केले नव्हते. डीआरसीमध्ये तो निर्णय नंतर बदलण्यात आला.

दरम्यान, पंचाकडून देण्यात येणाऱ्या चुकीच्या निर्णयामध्ये तिसऱ्या पंचांकडून हस्तक्षेप का केला जात नाही? या प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले आहे.