आयपीएलच्या गुरूवारी झालेल्या सामन्यात एबी डिव्हीलियर्सने एक अफलातून झेल टिपला. सोशल मिडीयाच्या माध्यमातून हा झेल घराघरात पोहोचला. त्या झेलची तुलना इतिहासातील काही निवडक झेलांशी करण्यात आली. काहींनी डिव्हीलियर्सला सुपरमॅन म्हटले तर काहींनी त्याला स्पायडरमॅन म्हटले. सोशल मिडीयावर तर हा झेल ‘सुपर कॅच’ म्हणून प्रसिद्ध झाला. मात्र, हा झेल घेताना तो चेंडू नशिबाने माझ्या हातात आला, अशी प्रतिक्रिया एबी डिव्हीलियर्स याने दिली.

तो झेल जसा दिसला, तितका सोपा नव्हता. मी तो झेल ज्या पद्धतीने पकडला, त्यामुळे तो थोडा सोपा दिसला. मी झेल घेण्यासाठी ज्यावेळी धावायला सुरूवात केली, त्यावेळी मी अत्यंत चुकीच्या पोझिशनमध्ये होतो. त्यातच मी झेल घेण्यासाठी उडी मारली. उडी मारताच मला समजलं की मी काहीसा सीमारेषेच्या दिशेने जास्त झुकलो आहे. त्यामुळे मी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला आणि नशिबाने तो चेंडू माझ्या हातात बसला, असे तो म्हणाला.

तो झेल पकडल्यानंतर मला खूप आनंद झाला. अखेर मी देखील माणूसच आहे. काही वेळा माझ्याकडूनही चूक होते. हा झेल पकडताना चेंडू हवेत थोडा वळला. पण माझ्या नशिबाने मला साथ दिली, असेही तो म्हणाला.

बंगळूरूच्या संघाने दिलेल्या २१९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या अॅलेक्स हेल्सने पाय क्रिझ बाहेर काढून मोईन अलीने टाकलेला चेंडू हवेत टोलवला. हा चेंडू उंचावरून जाताना डिव्हीलियर्सने एका हाताने हवेतच अप्रतिमरित्या तो झेल टिपला होता.

हाच तो झेल –