सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या हंगामात अनेक देशी विदेशी नवोदित खेळाडूंचा भरणा आहे. त्यापैकी कित्येक खेळाडू चमकदार कामगिरीही करत आहेत. या खेळाडूंची प्रतिभा, त्यांची खेळण्याची पद्धत, त्यांची विचार करण्याची शक्ती या सगळ्या गोष्टी अनुभवी खेळाडूंना खूपच प्रभावित करत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा प्रशिक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस हादेखील एका नवोदित भारतीय खेळाडूची प्रतिभा पाहून अवाक झाला आहे.

तो खेळाडू म्हणजे १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानविरुद्ध बेधडक फलंदाजी करणारा आणि भारताला सामना जिंकवून देणारा शुभमन गिल. १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपासून त्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या याच कामगिरीच्या बळावर १८ वर्षीय शुभमनला कोलकाता संघाने १.८ कोटी रुपये देऊन खरेदी केले. शुभमनने आतापर्यंत आठ सामन्यात १२९ धावा केल्या आहेत. ही एकंदर कामगिरी जरी लक्ष वेधून घेणारी नसली, तरी त्याने चेन्नईसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खळलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीने पुन्हा एकदा साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

त्यातही विशेषतः कोलकाता संघाचा प्रशिक्षक जॅक कॅलिस हा तर त्याची प्रतिभा पाहून अवाक झाला. जॅक कॅलिस शुभमनबाबत बोलताना म्हणाला की चेन्नईविरुद्धच्या सामन्यात आम्ही २ गडी झटपट गमावले. त्यामुळे शुभमनला फलंदाजीच्या क्रमवारीत वरती खेळण्यास पाठवता आले आणि त्याने तो सामना आणि आमची मने जिंकली. शुभमन हा चांगला फलंदाज आहे. त्याला कठीण प्रसंगी खेळायला पाठवून त्याच्याकडून खूप अपेक्षा ठेवायच्या नाहीत. त्याला त्याच्या पद्धतीने आणि कलाने खेळू द्यायचे, जेणेकरून त्याची फलंदाजी अधिक बहरेल आणि त्याचा संघालाही फायदा होईल, असे संघ व्यवस्थापनाने आधीच ठरवले होते, असे कॅलिस म्हणाला.

चेन्नई संघाविरुद्धच्या सामन्यात तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी गेला. तो सामना आम्हाला जिंकणे आवश्यक होते. त्यावेळी तो एका नवोदित खेळाडूसारखा नव्हे तर परिपक्व खेळाडूप्रमाणे खेळला. एका फलंदाजाकडे असायला हवे असलेले सगळे फटके त्याच्याकडे आहेत, हे मी जाणतो. पण त्यावेळी परिस्थितीची गरज ओळखून तो खेळला. त्याची निर्णयक्षमता आणि दबावाखाली असताना विचार करण्याची पद्धत पाहून मी प्रभावित झालो. क्रिकेटमधील त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल यात शंका नाही, असेही कॅलिस म्हणाला.