सलग दोन विजयांनिशी कोलकाता येथे दाखल झालेल्या सनरायजर्स हैदराबाद संघाला रोखण्याचे आव्हान इंडियन प्रीमिअर क्रिकेट लीगमध्ये (आयपीएल) शनिवारी होणाऱ्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्ससमोर उभे ठाकले आहे.

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने स्पर्धेत दिमाखदार सुरुवात करत गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले आहे. दुसरीकडे कोलकाताला चेन्नईविरुद्धच्या सामन्यात दोनशेहून अधिक धावा करूनसुद्धा पराभव पत्करावा लागला.

कागदावर हैदराबाद संघ समतोल वाटत आहे. अनुभवी फलंदाजांसहित प्रभावी गोलंदाजांचा भरणा हैदराबादकडे आहे. मात्र मुंबईविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवताना त्यांना कठोर परिश्रम घ्यावे लागले. फक्त एक विकेट राखून शेवटच्या चेंडूवर हैदराबादने लक्ष्य गाठले. शिखर धवन, मनीष पांडे, दीपक हुडा, युसूफ पठाण असे गुणवान फलंदाज हैदराबादच्या ताफ्यात आहेत. फिरकी गोलंदाज रशिद खानचे चेंडू खेळणे फलंदाजांना अजूनही कठीण जात आहेत. त्याला साथ देण्यासाठी भुवनेश्वर कुमार, बिली स्टेनलेक, सिद्धार्थ कौल सक्षम आहेत.

कोलकाता संघाला अखेरच्या षटकांमधील गोलंदाजीचा प्रश्न भेडसावत आहे. गचाळ क्षेत्ररक्षण आणि विनय कुमारच्या सुमार गोलंदाजीमुळे कोलकाताला चेन्नईविरुद्ध हार पत्करावी लागली. मिचेल जॉन्सन तंदुरुस्त झाल्याने त्याचे संघातील स्थान पक्के मानले जात आहे. फलंदाजीत मात्र कोलकाताने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. आंद्रे रसेल, सुनील नरिन, ख्रिस लिन तिघेही गोलंदाजांचा खरपूस समाचार घेण्यात वाकबदार आहेत. याशिवाय कर्णधार दिनेश कार्तिक, नितीश राणा व रॉबिन उथप्पा अशा अनुभवी व युवा फलंदाजांचा भरणा कोलकाता संघात आहे.

सामन्याची वेळ :रात्री ८ वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर.