आयपीएलच्या अकराव्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय खराब झालेली आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सला केवळ २ सामन्यांमध्ये विजय मिळवता आलेला आहे, त्यामुळे उरलेल्या ६ सामन्यांपैकी ६ सामन्यांमध्ये विजय न मिळवल्यास मुंबईचं या स्पर्धेतं आव्हान संपणार आहे. मात्र त्याआधीच मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी मार्गदर्शक लसिथ मलिंगा स्पर्धेच्या मध्यावरच श्रीलंकेला परतण्याची शक्यता आहे.

३४ वर्षीय लसिथ मलिंगाला श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान हवं असल्यास त्याने स्थानिक स्पर्धांमध्ये खेळालं अशी अट श्रीलंकेच्या निवड समितीने घातली आहे. त्यामुळे लसिथ मलिंगा आता नेमका काय निर्णय घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. २ मे पासून श्रीलंकेत स्थानिक वन-डे सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या संघात पुनरागमन करण्यासाठी मलिंगाला या स्पर्धेत खेळावं लागणार असल्याचं लंकेच्या निवड समितीने स्पष्ट केलं आहे.

अकराव्या हंगामासाठी पार पडलेल्या लिलावात, लसिथ मलिंगावर मुंबई इंडियन्सने बोली लावली नव्हती. मात्र यानंतर मुंबईच्या संघाने मलिंगाला गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून संघात समाविष्ट करुन घेतलं होतं. यानंतर सप्टेंबर २०१७ पासून मलिंगा श्रीलंकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाहीये. त्यामुळे श्रीलंकन निवड समितीने दिलेल्या अल्टीमेटमवरुन मलिंगा श्रीलंकेला परततो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.