मुंबई-दिल्लीमध्ये गुणांचे खाते उघडण्यासाठी चढाओढ

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील गतविजेता मुंबई इंडियन्स आणि गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्ली डेअरडेव्हिल्स या दोन्ही संघांना इंडियन प्रीमिअर लीगमधील(आयपीएल) आतापर्यंतच्या दोन सामन्यांपैकी अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या वानखेडे स्टेडियमवरील तिसऱ्या सामन्यात विजयारंभ करीत गुणांचे खाते कोण उघडतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

मुंबई संघाला आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांत शेवटच्या क्षणी पराभव स्वीकारावा लागला. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघांविरुद्ध अवघ्या एका विकेटने त्यांचा पराभव झाला. दुसरीकडे दिल्लीला मात्र किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सने सहज धूळ चारली.

नावाजलेल्या फलंदाजांचा भरणा असलेल्या मुंबईने आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी केलेली नाही. कर्णधार रोहित शर्मा, एविन लुईस, किरॉन पोलार्ड, बेन कटिंग यांच्याकडून संघाला मोठय़ा खेळीची अपेक्षा असेल. गोलंदाजीत मयांक मरकडे अप्रतिम कामगिरी करत असून स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अग्रस्थानी आहे. त्याला मुस्ताफिझूर रेहमान आणि जसप्रित बुमराकडून योग्य साथ मिळण्याची आवश्यकता आहे.

दिल्ली संघासाठी आघाडीच्या फलंदाजांचे फॉर्मात येणे महत्त्वाचे आहे. गंभीर वगळता श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कॉलिन मन्रो, ग्लेन मॅक्सवेल यांना फलंदाजीत चमक दाखवावी लागेल. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट आणि अमित मिश्रा यांच्यावर दिल्लीची मदार आहे.

’ सामन्याची वेळ : संध्याकाळी ४ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर.