आयपीएलच्या अकराव्या हंगामात महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज संघ सध्या चांगलाच फॉर्मात आहे. चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या सामन्यात बंगळुरुने दिलेलं २०६ धावांचं आव्हान धोनी आणि रायडूने तुफान फटकेबाजी करत सहज पार केलं. यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र धोनीच्या खेळाचं कौतुक करण्यात आलं. मात्र चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी अंबाती रायडूच्या खेळाचं कौतुक करुन, चेन्नईच्या विजयात त्याचा वाटाही मोलाचा असल्याचं मान्य केलंय.

अवश्य वाचा – धोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव

“धोनीने ज्या पद्धतीने खेळला आहे, ते पाहता प्रसारमाध्यमं त्याचं कौतुक करणार हे नक्की. मात्र अंबाती रायडूनेही तितकीच प्रशंसनीय कामगिरी केली आहे. प्रत्येक खेळपट्टीवर रायडू सातत्याने चांगली खेळी करतोय, त्यामुळे चेन्नईच्या संघाचा तो अविभाज्य हिस्सा बनलेला आहे.” पत्रकारांशी संवाद साधताना स्टिफन प्लेमिंगने अंबाती रायडूच्या खेळीचं कौतुक केलं.

अवश्य वाचा – ‘धोनी केवळ मॅच संपवत नाही, तो टीकाकारांनाही संपवतो’ ; चाहत्यांमध्ये नवा उत्साह

अंबातीच्या फटक्यांमध्ये खूप ताकद आहे. मात्र दुर्दैवाने त्याच्या प्रतिभेला हवा तसा वाव मिळाला नाही. मात्र चेन्नईसाठी त्याने जी काही खेळी केली आहे, ती पाहता आमच्यासाठी तो महत्वाचा खेळाडू आहे. याचसोबत संघातल्या इतर महत्वाच्या खेळाडूंनीही रायडूला पाठींबा दिला आहे. त्यामुळे रायडू सध्या चांगल्या लयीत आहे. एक प्रशिक्षक म्हणून मला याचा नक्कीच आनंद असल्याचंही फ्लेमिंगने स्पष्ट केलं.

अवश्य वाचा – धोनीने चपळाईने केलेल्या ‘त्या’ दोन रनआऊटमुळे सामन्याचा नूरच पालटला