इंदूर : राजस्थान रॉयल्सकडून किंग्ज इलेव्हन पराभूत झाल्यानंतर प्रीती झिंटाने भर मैदानावर मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागला जाब विचारल्याच्या वृत्ताचे दोन्ही बाजूने खंडन करण्यात आले आहे. एका सामान्य चर्चेला फोडणी देऊन वाढवून दाखवण्यात आले असल्याचे प्रीतीने ‘ट्विटर’वर म्हटले आहे, तर सेहवागने या सर्व अफवा असल्याचे म्हणत कानावर हात ठेवले आहेत.

पंजाब संघात करुण नायर आणि मनोज तिवारीसारखे फलंदाज असतानाही सेहवागने कर्णधार अश्विनला वरच्या स्थानावर फलंदाजीला पाठवण्याचा केलेला प्रयोग फसल्यामुळे पंजाब पराभूत झाला होता. त्या पाश्र्वभूमीवर प्रीतीने मैदानावर केलेल्या जाबजबाबामुळे सेहवागला खूप वाईट वाटल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रीतीने तिच्या ‘ट्विटर’वरून त्याबाबतचा खुलासा केला आहे. याबाबतचे वृत्त देणाऱ्या दैनिकाला फैलावर घेताना प्रीतीने म्हटले आहे की, ‘‘तुम्ही पुन्हा एकदा चूक केली आहे. हे संपूर्ण वृत्त खोटे असून त्यामुळे मला काही क्षणातच खलनायिका ठरवले गेले आहे.’’