इंदूर : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) गुणतालिकेतील आपले तिसरे स्थान शाबूत राखण्याचे आव्हान किंग्ज इलेव्हन पंजाबपुढे असणार आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी पंजाबचा कोलकाता नाइट रायडर्सशी सामना होणार आहे. बाद फेरीची लढाई अधिक तीव्र झाली असताना मागील सामन्यात पराभव पत्करणारे हे दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक आहेत.

पंजाबच्या खात्यावर सहा विजयांसह १२ गुण जमा आहेत, तर पाचव्या स्थानावरील कोलकाताने ५ विजयांसह १० गुण मिळवले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने कोलकाताचा १०२ धावांनी पराभव करून आपली निव्वळ धावगती वाढवली. पंजाबने राजस्थान रॉयल्सकडून १५ धावांनी हार पत्करली.

पंजाबच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने सलामीवीर ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांच्यावर होती. या दोघांच्या खात्यावर अनुक्रमे ४७१ आणि ३११ एकूण धावा जमा आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबचे सर्व फलंदाज अपयशी ठरत असतानाही राहुलने ७० चेंडूंत नाबाद ९५ धावा काढल्या. करुण नायरने ९ डावांमध्ये २४३ धावा केल्या आहेत. अनुभवी युवराज सिंग, आरोन फिन्च आणि मयांक अगरवाल मधल्या फळीतील आपली उपयुक्तता सिद्ध करू शकले नाहीत.

पंजाबच्या गोलंदाजीची मदार कर्णधार रविचंद्रन अश्विन आणि मध्यमगती गोलंदाज मोहित शर्मा यांच्यावर आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज बरिंदर शरण, अ‍ॅन्ड्रय़ू टाय आणि अफगाणी फिरकी गोलंदाज मुजीब उर रेहमान यांनी जबाबदारीने गोलंदाजी केली आहे. टायने ८ सामन्यांत १६ बळी घेतले आहेत, तर वेगवान गोलंदाज अंकित रजपूत आणि रेहमान यांनी अनुक्रमे ८ आणि १४ बळी मिळवले आहेत.

दुसरीकडे कोलकाताला बाद फेरीमधील आपले स्थान टिकवायचे असेल, तर मुंबईविरुद्धचा विजय मागे टाकायला हवा. कारण यंदाच्या हंगामातील सर्वात मानहानीकारक विजय त्यांच्या वाटय़ाला आला. सलामीवीर ख्रिस लिन आणि सुनील नरिन सातत्यपूर्ण कामगिरी दाखवण्यात अपयशी ठरत आहेत. फक्त दिनेश कार्तिकला सातत्य दाखवता आले आहे. त्याने ११ सामन्यांतून ३२१ धावा केल्या आहेत. उपकर्णधार रॉबिन उथप्पाने गरजेच्या वेळी कामगिरी उंचावली आहे.

कोलकाताच्या गोलंदाजीची मदार प्रामुख्याने फिरकीवर आहे. यात ‘चायनामन’ कुलदीप यादवने ११ सामन्यांत ८ बळी मिळवले आहेत. मात्र मुंबईविरुद्धच्या सामन्यात नरिनशिवाय बाकी सर्व गोलंदाज महागडे ठरले होते. लेग-स्पिनर पीयूष चावलाने ४४ धावा दिल्या होत्या.

ल्ल सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.

ल्ल थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.