आयपीएलच्या यंदाच्या हंगामात स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी राजस्थान रॉयल्सचा संघ खूप प्रयत्न करत आहे. राजस्थानने आतापर्यंत झालेल्या १० सामन्यांपैकी केवळ ४ सामने जिंकले असून त्यांचे ८ गुण आहेत. अशा परिस्थितीत स्पर्धेच्या साखळी फेरीतील उरलेले जवळपास सर्व सामने जिंकणे राजस्थानला महत्वाचे आहे.

शुक्रवारी या फेरीतील राजस्थानचा ११ वा सामना चेन्नईविरुद्ध घरच्या मैदानावर होणार आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा संघ पूर्ण तयारीनिशी मैदानावर उतरणार आहेच. पण त्याचा संघ नियमित भडक निळ्या रंगाच्या जर्सीत नव्हे, तर गुलाबी रंगाच्या जर्सीत सामना खेळणार आहे.

हा सामना गुलाबी जर्सीत खेळण्यामागचे कारणही विशेष आहे. राजस्थानचा संघ आणि संघ व्यवस्थापन आपले सामाजिक भान जपत कर्करोगाच्या निदानाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी गुलाबी जर्सी घालून सामना खेळणार आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे, हेन्रीच क्लासें, कृष्णप्पा गौथम आणि महिपाल लोमलोर या खेळाडूंनी एका कार्यक्रमात गुलाबी जर्सीचे अनावरण केले.

या जर्सीमध्ये गुलाबी (स्तनांच्या कर्करोगासाठी), तांबडा (तोंडाच्या कर्करोगासाठी) आणि करडा (गर्भाशयाच्या कर्करोगासाठी) अशा तीन रंगाचे मिश्रण असणार आहे. कर्करोगाबाबत जनजागृती करणाऱ्या राज्य सरकार आणि विविध राष्ट्रीय संस्थांना राजस्थानच्या या पुढाकाराने मदतच होणार आहे.

कर्करोगाच्या आजाराच्या दृष्टिने पाहता हा निर्णय अगदी छोटा पण कर्करोगमुक्त समाजाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या सामन्यात आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करू आणि शक्य तितकी याबाबत जनजागृती करू, अशी अपेक्षा अजिंक्य रहाणेने व्यक्त केली.

हे संघही विशिष्ट कारणासाठी घालतात वेगळ्या रंगाची जर्सी

एका विशिष्ट कारणासाठी वेगळ्या रंगाची जर्सी घालून खेळणारा राजस्थान हा आयपीएलमधील पहिलाच संघ नाही. हरित क्रांतीच्या उद्देशाने बंगळुरूच्या संघातील खेळाडू दरवर्षी घरच्या मैदानावर एक सामना हिरव्या रंगाची जर्सी घालून खेळतात. यावेळी जर्सीवर खेळाडूंची ट्विटर हॅण्डलवरील नावे छापली जातात. आणि कर्णधार कोहली प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला एक छोटेसे रोप भेट म्हणून देतो.

याशिवाय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्षातून एकदा दक्षिण आफ्रिकेचा संघ स्तनांच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी गुलाबी रंगाची जर्सी घालून एकदिवसीय सामना खेळतो.