आयपीएलचा यंदाचा हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाने हैदराबादला नमवून स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आज कोलकाताचा संघ बाद फेरीच्या सामन्यात राजस्थानशी दोन हात करणार आहे. बाद फेरीतील विजेत्या संघाशी चेन्नईची लढत रंगणार आहे.

धोनाच्या संघाने ९ पैकी तब्बल ७ वेळा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे आणि दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. कोलकाताचा संघही चांगलाच फॉर्मात असून संघात रॉबिन उथप्पासारखे स्फोटक फलंदाज आहेत. कोलकातानेही दोन वेळा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले आहे. मात्र, आजपर्यंत एकही विजेतेपद न जिंकलेल्या दिल्लीच्या संघातील यष्टिरक्षक ऋषभ पंतने एक असा कारनामा केला आहे, जो धोनी किंवा रॉबिन उथप्पालाही शक्य झालेला नाही.

एखाद्या यष्टिरक्षकाने एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऋषभने केला आहे. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये तब्बल ६८४ धावा ठोकल्या असून त्याने रॉबिन उथप्पाचा विक्रम मोडीत काढला आहे. उथप्पाने २०१४साली ६६० धावा करत हा विक्रम प्रस्थापित केला होता. हा विक्रम मोडण्यासाठी ४ वर्षे लागली. ऋषभने यंदाच्या हंगामात ५२.६१च्या सरासरीने एकूण ६८४ धावा केल्या आहेत. यात एका झंझावाती शतकाचाही (नाबाद १२८) समावेश आहे. या हंगामात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.

धोनी मात्र यष्टिरक्षकाने एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमाच्या यादीत खूप मागे आहे. त्याने आतापर्यंत २०१३च्या हंगामात सर्वाधिक ४६१ धावा केल्या होत्या. यंदाच्या हंगामात धोनीने ४५५ धावा केल्या असून तो आणखी एक (अंतिम) सामना खेळणार आहे. त्यामुळे स्वत:चा हंगामातील सर्वाधिक धावांचा टप्पा तो पार करतो का? हेदेखील पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.