मुंबई इंडियन्सचा संघ दिल्लीशी पराभूत झाला आणि प्लेऑफ च्या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. ३ वेळा आयपीएलच्या चषकावर नाव कोरणाऱ्या गतविजेत्या मुंबईवर यंदाच्या हंगामात साखळी फेरीतच बाद होण्याची नामुष्कीओढवली. मुंबईच्या पराभवाची अनेकांनी अनेक कारणे सांगितली. त्या कारणांपैकी एक महत्वाचे कारण म्हणजे कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म.

रोहित शर्माने पहिल्या हंगामापासून आयपीएलमध्ये आपला ठसा उमटवला. मुंबईचे कर्णधारपद भूषवताना त्याने अनेक निर्णय घेतले. पण त्याची फलंदाजी मात्र म्हणावी तशी बहरली नाही. आणि त्यामुळेच यंदाच्या आयपीएलमध्ये एक अशी गोष्ट घडली, जी गेल्या ९ हंगामात रोहितला शक्य झाली होती. मात्र, या हंगामात त्याला ती जमली नाही.

रोहित शर्माने यंदाच्या हंगामात एकूण १४ सामने खेळत २८६ धावा केल्या. पण हे त्याचे प्रयत्न मुंबईला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी फारच तोकडे पडले. इतकेच नव्हे तर आयपीएलच्या इतिहासात प्रथमच त्याने एका हंगामात ३००पेक्षा कमी धावा केल्या. रोहितचा आयपीएलमधील इतिहास पाहता त्याने हा हंगाम वगळता प्रत्येक हंगामात ३००हून अधिक धावा केल्या आहेत. मात्र या हंगामात त्याला ३००हून धावा करणं जमलं नाही.

रोहितच्या फॉर्मचा फटका साहजिकच संघालाही बसला. संपूर्ण हंगामात कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी त्याला फारशी करता आली नाही. आव्हानाचा पाठलाग करताना तर त्याने अतिशय खराब फलंदाजी केली. याचाच फटका संघाला बसला आणि गतविजेता संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला.