आज दिल्लीशी सामना

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाद फेरीमध्ये स्थान मिळवण्यासाठी झगडणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुची गाठ शनिवारी आव्हान संपुष्टात आलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सशी पडणार आहे.

बेंगळूरुला १० सामन्यांपैकी फक्त तीन विजय मिळवता आले आहेत. मात्र उर्वरित चारही सामने जिंकल्यास ते बाद फेरीत स्थान मिळवू शकतात. मात्र आतापर्यंतची बेंगळूरुची कामगिरी पाहता त्यांच्याकडून फारशा अपेक्षा करता येणार नाही.

सनरायजर्स हैदराबादविरुद्ध मागील सामना गमावल्यानंतर बेंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीकडे प्रतिक्रियेसाठी शब्द नव्हते. संघाच्या वृत्तीबाबतही त्याने आपले मत प्रकट केले. १४७चे लक्ष्य पेलताना आलेले अपयश तो लपवू शकला नाही. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात बेंगळूरुच्या फलंदाजांना जेमतेम १२७ धावा करता आल्या होत्या. बेंगळूरुचा संघ कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांच्यावर बरासचा अवलंबून दिसला. कोहलीच्या नावावर सर्वाधिक ३९६ धावा (४९.५० धावांची सरासरी) आहेत. मनदीप सिंग, क्विंटन डी कॉक आणि ब्रँडन मॅक्क्युलम यांनी आता गरजेच्या वेळी अपेक्षांची पूर्तता करणारी कामगिरी करायला हवी.

अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आतापर्यंत अपयशी ठरला आहे. त्याने ४८ धावांच्या सरासरीने फक्त ४ बळी मिळवले आहेत. वेगवान गोलंदाज टिम साऊदी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज सातत्यपूर्ण प्रभाव पाडू शकलेले नाहीत.

सनरायजर्स हैदराबादकडून पराभूत झालेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान गुरुवारी संपुष्टात आले. ऋषभ पंतची धडाकेबाज नाबाद शतकी खेळी दिल्लीला तारू शकली नाही. बेंगळूरुविरुद्धच्या सामन्यासाठी नेपाळचा फिरकी गोलंदाज संदीप लॅमिचाने आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ज्युनियर डाला यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

* सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.