यंदाच्या आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची कामगिरी खराब राहिली. मात्र, आपल्या अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 11 धावांनी पराभव करुन दिल्लीने आयपीएलचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. आयपीएलमधील आव्हान संपल्यानंतर आता दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगची प्रतिक्रिया आली आहे.

सुरूवातीच्या सामन्यांमध्ये संघाच्या खराब प्रदर्शनाची जबाबदारी घेत गौतम गंभीरने संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. माझ्या मते. गंभीरने कर्णधारपद सोडल्यामुळे संघाच्या प्रदर्शनावर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. पण माझ्यासोबत अनेक खेळाडू गंभीरच्या निर्णयामुळे हैराण झाले होते. कर्णधारपद सोडणं हा खरंच एक धाडसी निर्णय होता, असे निर्णय नेहमी घेतले जात नाही. गंभीरचा हा निर्णय एक माणूस म्हणून त्याच्या व्यक्तिमत्वाबाबत बऱ्याच गोष्टी सांगणारा आहे. कर्णधारपद सोडण्यासोबत संघामध्येही न खेळण्याच्या त्याच्या निर्णयामुळे पृथ्वी शॉ सारख्या तरुण फलंदाजाला संधी मिळाली’, असं म्हणत पाँटिंगने गंभीरच्या निर्णयाची पाठराखण केली.

मुंबईविरोधातील सामना संपल्यानंतर बोलताना गंभीरने तरुण भारतीय खेळाडूंचं विशेष कौतुक केलं. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या फलंदाजीचं आणि श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाचं त्याने तोंडभरुन कौतुक केलं. अय्यरची कारकीर्द मोठी राहिल केवळ आयपीएलमध्ये नाही तर भारतीय क्रिकेटसाठीही तो खेळेल असं भाकित, पाँटिंगने वर्तवलं.

आयपीएलच्या या सत्रात दिल्लीने केवळ ५ विजय मिळवले तर ९ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यामुळे गुणतालिकेत दिल्ली तळाच्या स्थानी आहे.