इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) विजयी घोडदौड राखत गुणतालिकेत अग्रस्थान काबीज करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादची तिसऱ्या स्थानावरील किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीत अग्निपरीक्षा ठरणार आहे.

केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील हैदराबादने आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकण्याची किमया साधली आहे. याचे प्रमुख श्रेय त्यांच्या गोलंदाजांना जाते. दुसरीकडे रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाबच्या संघाने कात टाकली आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्ला करीत आक्रमक फलंदाजी हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. पंजाबने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. अगदी याच मैदानावर झालेला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा रोमहर्षक सामनासुद्धा त्यांनी जिंकण्याची किमया साधली आहे.

हैदराबादच्या गोलंदाजीच्या माऱ्यात फार मोठी नावे नाहीत. परंतु भुवनेश्वर कुमार, रशिद खान, बिली स्टॅनलेक, सिद्धार्थ कौल, शकिब अल हसन आणि संदीप शर्मा ही गोलंदाजीची फळी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात वाकबदार आहे.

हैदराबादकडे फलंदाजीची फळी मात्र अनुभवी आहे. वृद्धिमान साहा, केन विल्यम्सन, शिखर धवन आणि मनीष पांडे हे त्यांचे महत्त्वाचे फलंदाज. याशिवाय मधली फळीसुद्धा शकीब, दीपक हुडा आणि युसूफ पठाण यांच्यामुळे अधिक विस्तारली आहे.

मोठय़ा धावसंख्येचे आव्हान अद्याप हैदराबादच्या वाटय़ाला आले नाही. मुंबई इंडियन्सचे १४८ धावांचे लक्ष्य पेलताना हैदराबादने अखेरच्या चेंडूवर एक विकेट राखून विजय साकारला होता. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात हैदराबादने त्यांना ९ बाद १२५ धावांवर रोखले. त्यानंतर एका फलंदाजाच्या मोबदल्यात आरामात विजय साकारला. शिखर धवनने नाबाद ७८ आणि विल्यम्सनने नाबाद ३६ धावांचे योगदान दिले. मग कोलकाता नाइट रायडर्सला ८ बाद १३८ धावसंख्येवर रोखून ५ विकेट राखून विजय मिळवला. भुवनेश्वरने या सामन्यात तीन बळी घेतले.

दुसरीकडे, चेन्नईविरुद्ध ४ धावांनी विजय मिळवणाऱ्या पंजाबचाही आत्मविश्वास दुणावला आहे. घरच्या मैदानावर पंजाबने आपल्या १९७ धावसंख्येचे रक्षण केले. स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या सर्वोत्तम फलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने ३३ चेंडूंत ६३ धावा केल्या आणि लोकेश राहुलसोबत ९६ धावांची भागीदारी केली. मयांक अगरवाल, करुण नायर आणि अश्विन यांची बॅटसुद्धा तळपते आहे. मात्र महत्त्वाचा फलंदाज युवराज सिंगला अद्याप सूर गवसलेला नाही. त्याने तीन सामन्यांत १२, ४ आणि २० अशा एकूण ३६ धावा केल्या आहेत.

पंजाबने घरच्या मैदानावर दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध दिमाखदार विजयासह हंगामाला प्रारंभ केला. मात्र त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धचा सामना गमावला. प्रथमच नेतृत्वाची धुरा सांभाळणारा अश्विन उत्तमपणे निर्णय घेतो आहे. १७ वर्षीय मुजीब-उर-रेहमान आपल्या फिरकीने फलंदाजांना त्रस्त करीत आहे. याशिवाय अश्विनच्या ताफ्यात अक्षर पटेल, अँड्रय़ू टाय हे गोलंदाजसुद्धा आहेत.