थेट अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी उभय संघांमध्ये संघर्ष

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) साखळीचा थरार रविवारी अखेरच्या दिवसांपर्यंत उत्कंठा टिकवणारा ठरला. ५६ सामन्यांनंतर चार अव्वल संघ तावूनसुलाखून बाद फेरीसाठी पात्र ठरले आहेत. यापैकी सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज हे आयपीएल गुणतालिकेतील दोन अव्वल संघ मंगळवारी ‘क्वालिफायर-१’ (पात्रता-१) लढतीत एकमेकांशी भिडणार आहेत. त्यामुळेच या लढतीला महामुकाबल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

यंदाच्या हंगामात चेन्नईने दोन्ही साखळी सामन्यांमध्ये हैदराबादला हरवल्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये अंबाती रायुडू चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरल्यामुळे त्याला जेरबंद करण्याचे आव्हान हैदराबादपुढे असेल. त्याने एका सामन्यात शतक झळकावले, तर दुसऱ्या सामन्यात नाबाद ७९ धावा काढल्या होत्या.

आयपीएल गुणतालिकेत हैदराबाद आणि चेन्नई या दोन्ही माजी विजेत्यांच्या खात्यावर प्रत्येकी १८ गुण जमा आहेत. निव्वल धावगतीचा किंचितसा फरक या दोन संघांमध्ये आहे. त्यामुळेच मुंबईकर क्रिकेटरसिकांना थरारक लढतींची अनुभूती मिळणार आहे.

चेन्नईनेच हैदराबादची सलग सहा सामन्यांच्या विजयांची मालिका खंडित केली होती. पुण्यात १३ मे रोजी झालेला हा सामना चेन्नईने आठ विकेट राखून जिंकला होता. याशिवाय उसळणाऱ्या खेळपट्टीचा फायदा घेण्यातही ते वाकबदार आहेत. पुण्यात रविवारी चेन्नईने किंग्ज इलेव्हन पंजाबवर अनपेक्षित विजय मिळवला. हैदराबादनने १० मे रोजी दिल्ली डेअरडेव्हिल्सला हरवून बाद फेरीतील स्थान सर्वप्रथम निश्चित केले. मात्र त्यानंतर ओळीने तीन सामने गमावले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये त्यांच्या गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.

रायुडू चेन्नईचा प्रमुख आधारस्तंभ

’रायुडू हा चेन्नईच्या फलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ आहे. त्याने यंदाच्या हंगामात एकंदर ५८६ धावा केल्या आहेत. मात्र चेन्नईची फलंदाजी एखाद-दुसऱ्या फलंदाजावर अवलंबून नाही, हेच त्यांचे बलस्थान आहे. शेन वॉटसनने १३ सामन्यांमध्ये ४३८ धावा केल्या आहेत. कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना हे दोघेसुद्धा सातत्यपूर्ण फलंदाजीने संघाला तारत आहेत. रविवारी पंजाबविरुद्ध रैनाने नाबाद ६१ धावा काढल्या होत्या.

’दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीने अप्रतिम गोलंदाजी करून रविवारी सर्वाचे लक्ष वेधले होते. त्याने ४ षटकांत १० धावा देत ४ बळी मिळवले आणि सामनावीर पुरस्कार पटकावला. याशिवाय शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि ड्वेन ब्राव्हो यांच्यावर चेन्नईच्या वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल. तसेच हरभजन सिंग आणि रवींद्र जडेजा हे अनुभवी खेळाडू फिरकी धुरा वाहतील.

हैदराबादची भिस्त विल्यम्सनवर

’हैदराबादची प्रमुख भिस्त कर्णधार केन विल्यम्सनवर असणार आहे. हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विल्यम्सनने ६० धावांच्या सरासरीने एकूण ६६१ धावा काढताना दुसरे स्थान मिळवले आहे.

’शिखर धवननेही (एकूण ४३७ धावा) सातत्याचा प्रत्यय घडवला आहे. हैदराबादच्या मधल्या फळीनेही जबाबदारीने खेळण्याची आवश्यकता आहे. फक्त मनीष पांडेच अपेक्षांची पूर्तता करताना दिसत आहे.

’गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कोल आणि संदीप शर्मा यांच्यावर वेगवान माऱ्याची धुरा आहे, तर रशिद खान आणि शकिब अल हसन यांच्यावर फिरकीची मदार आहे.

संघ

चेन्नई सुपर किंग्ज :

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फॅफ डय़ू प्लेसिस, हरभजन सिंग, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, अंबाती रायुडू, दीपक चहर, के. ए. आसिफ, कनिश सेठ, लुंगी एन्गिडी, ध्रुव शोरी, मुरली विजय, सॅम बिलिंग्ज, मार्क वूड, शिट्झ शर्मा, मोनू कुमार, चैतन्य बिश्नोई, इम्रान ताहीर, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, एन. अ‍ॅगेडीसान, डेव्हिड विली.

सनरायझर्स हैदराबाद :

केन विल्यम्सन (कर्णधार), शिखर धवन, मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा, सिद्धार्थ कौल, दीपक हुडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसूफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बसिल थम्पी, टी. नटराजन, सचिन बेबी, बिपूल शर्मा, मेहदी हसन, तन्मय अगरवाल, अ‍ॅलेक्स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, रशिद खान, शकिब अल हसन, मोहम्मद नबी, ख्रिस जॉर्डन.

 

सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, स्टार माँ मूव्हीज, स्टार सुवर्णा प्लस, जलशा मूव्हीज.

बाद फेरीच्या लढती  २२ मे, मंगळवार

क्वालिफायर – १ सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्ज

स्थळ : वानखेडे स्टेडियम, मुंबई

एलिमिनेटर २३ मे, बुधवार

कोलकाता नाइट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स

स्थळ : ईडन गार्डन्स, कोलकाता