बाद फेरीसाठी पुढील दोन्ही सामन्यात विजय साकारण्याचे विराटसेनेपुढे आव्हान

बेंगळूरु : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आता बाद फेरीच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. त्यात अव्वल चौघांमध्ये हैदराबाद, चेन्नईने स्थान निश्चि केले असले तरी दिल्लीवगळता सर्वच संघ शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्याच पाश्र्वभूमीवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा संघ गुरुवारी सनरायझर्स हैदराबादचा सामना करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या लढतीत त्यांच्या खडूस गोलंदाजीसाठी प्रसिद्ध  हैदराबादच्या संघासमोर बेंगळूरुचे आक्रमक फलंदाज आव्हान टिकवणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

विरट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळूरुने यंदा लौकिकाला साजेशी कामगिरी केलेली नाही. १२ सामन्यांतून पाच विजयांसह ते गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहेत. त्यामुळेच शिल्लक असलेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवला तरच बेंगळूरुला बाद फेरीची आशा धरून ठेवता येऊ शकते. मात्र मागील दोन लढतीत अनुक्रमे दिल्ली डेअरडेव्हिल्स व किंग्ज इलेव्हन पंजाबला धूळ चारल्यामुळे बेंगळूरुचा आत्मविश्वास वाढला आहे. कोहली आणि एबी डी’व्हिलियर्सवर बेंगळूरुची फलंदाजी अवलंबून आहे, हे सर्वानाच ठाऊक आहे. त्यामुळेच या दोघांना लवकर बाद केल्यास हैदराबादसाठी अर्धे काम सोपे होईल. गोलंदाजीत उमेश यादव पूर्ण लयीत असून त्याला फिरकीपटू युझवेंद्र चहल सुरेख साथ देत आहे. ऐन मोक्याच्या वेळी बेंगळूरुला लय सापडल्यामुळे ते हैदराबादविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील.

दुसरीकडे कर्णधार केन विल्यम्सनच्या हैदराबादने आधीच बाद फेरीतील स्थान पक्के केलेले आहे. मागील लढतीत त्यांना चेन्नईविरुद्ध पराभव पत्करावा लागला तरीही त्याकडे जास्त लक्ष न देता पुन्हा एकदा आपल्या जमेच्या बाजूंवर काम करण्याचे हैदराबादचे मनसुबे आहेत. सलामीवीर शिखर धवन आणि विल्यम्सन या दोघांची जोडी फोडणे प्रतिस्पध्र्याना कठीण जात आहे. शिवाय, युसुफ पठाण आणि शकिब अल हसनसुद्धा गरजेच्या वेळी उपयुक्त खेळी करण्यात पटाईत आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच हैदराबादची गोलंदाजांनी आपली छाप पाडली आहे. अनुभवी भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा हे वेगवान गोलंदाजांचे त्रिकूट व रशिद खानची जादूई फिरकी खेळणे भल्याभल्या फलंदाजांना जमलेले नाही. गोलंदाजांच्या बळावरच हैदराबादने बेंगळूरुला पहिल्या टप्प्यातील सामन्यांत पाच धावांनी पराभूत केले होते. एकूणच, प्रथम स्थानावर असणाऱ्या हैदराबादसाठी सर्व काही सुरळीत चालू असले तरी आज होणाऱ्या लढतीत बेंगळूरुला नमवून ते त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणणार का, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून आहे.

* सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स