आयपीएलच्या यंदाच्या हंगामात वेगवेगळे विक्रम मोडीत काढले जात आहेत. काही विक्रम नव्याने घडत आहेत. त्यात काही अजब असे विक्रमही प्रस्थापित केले जात आहेत. त्यातच एक विचित्र विक्रम झाला आहे. गोलंदाजी करताना सर्वाधिक धावा या शेवटच्या काही षटकात ठोकल्या जातात, ही तर जाहीर बाब आहे. मात्र त्यातही रोमांचक बाब म्हणजे शेवटच्या ४ षटकांपैकी १८व्या षटकात सर्वाधिक धावा ठोकल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आतापर्यंत या हंगामातील ४७ सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये १८वे षटक सर्वात महागडे षटक ठरले आहे. आकडेवारीनुसार पाहता आतापर्यंत डावाच्या १८व्या षटकात सर्वाधिक ९१६ धावा दिल्या गेल्या आहेत. त्या पाठोपाठच १९वे षटक हे महागडे ठरले आहे. १९व्या षटकांमध्ये एकूण मिळून ८७८ धावा ठोकण्यात आल्या आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे महागड्या षटकांच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाचे महागडे षटक हे चौथे षटक आहे. खेळपट्टीवर फलंदाज स्थिरावल्यानंतर पॉवर-प्लेचा फायदा घेत या षटकात एकूण ८७७ धावा केल्या गेल्या आहेत.

सर्वात कमी धावा देण्याच्या षटकांच्या यादीतील आकडेवारी पाहता आतापर्यंत पहिल्या षटकात सर्वात कमी म्हणजे ६०७ धावा, दुसऱ्या क्रमांकावर सातव्या षटकात ६५८ धावा आणि तिसऱ्या क्रमांकावर आठव्या षटकात ६८७ धावा देण्यात आल्या आहेत.

बळी टिपण्याचा बाबतीत २०व्या षटकात ५२, १९व्या षटकात ४४ आणि १८व्या षटकात ४१ ही तीन षटके सर्वात यशस्वी ठरली आहेत. तर, सर्वात कमी बळी मिळालेल्या षटकांमध्ये सातव्या षटकात सर्वात कमी १६, १०व्या षटकात १७ आणि ८व्या षटकात १८ बळी टिपले गेलेले आहे.