28 March 2020

News Flash

‘आम्ही दोघे भाऊ भाऊ’; IPL गाजवणाऱ्या भावांच्या या ‘टॉप ५’ जोड्या तुम्हाला माहिती आहेत का?

आयपीएलचा हंगाम चालू झाला की ती क्रिकेटरसिकांसाठी पर्वणी असते. आयपीएलमधील अशाच 'टॉप ५' भावांच्या जोड्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.

आयपीएलचा हंगाम चालू झाला की ती क्रिकेटरसिकांसाठी पर्वणी असते. या स्पर्धेत भारतातील आणि परदेशातील अनेक स्थानिक खेळाडूंना आपली चमक दाखवण्याची संधी मिळते. या स्पर्धेमुळे कधीकधी एकाच गावातील, एकाच स्थानिक संघातील तर कधीकधी एकाच कुटुंबातील खेळाडूंनाही खेळायची संधी मिळते. दोन भाऊदेखील यामुळे प्रकाशझोतात येतात आणि आयपीएलमध्ये आपला ठसा उमटवतात. आयपीएलमधील अशाच ‘टॉप ५’ भावांच्या जोड्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.

१. कृणाल आणि हार्दिक पांड्या

कृणाल पांड्या आंणि हार्दिक पांड्या ही भावांची जोडी सध्या आयपीएलमध्ये त्यांचा करिष्मा दाखवत आहे. हे दोघे मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहेत. हे दोघेही स्फोटक फलंदाज असून त्यांनी आपल्या फलंदाजीची चमक दाखवली आहे. हार्दिक पांड्याला आयपीएलमधील त्याच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघातही स्थान मिळाले आहे. तर कृणाल पांड्या भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.

कृणालचा २०१६पासून आयपीएलमध्ये मुंबईच्या संघात आहे. त्याने ३७ सामन्यात १५४ च्या स्ट्राईक रेटने ६७२ धावा केल्या आहेत, तर २७ बळी टिपले आहेत. हार्दिक २०१५ पासून मुंबईचे प्रतिनिधित्व करत असून त्याने ४८ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २८ गडी मिळवले आहेत आणि ६३० धावा केल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिकला रिटेन करण्यात आले, तर कृणालला राईट टू मॅचअंतर्गत संघात कायम करण्यात आले.

२. मायकल आणि डेव्हिड हसी

या यादीत दुसरी जोडी म्हणजे ऑस्ट्रेलियन भावंडं मायकल (माईक) हसी आणि डेव्हिड हसी. या दोघांनीही ऑस्ट्रेलियाच्या संघात खेळताना आपली कारकीर्द सुरु केली. माईक हा सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यात सातत्यपूर्ण खेळी करण्यात निपुण होता. तर डेव्हिड या मर्यादित शतकांच्या सामन्यात संघाचा महत्वाचा भाग होता.

आयपीएलमध्ये माईक हसी पहिली काही वर्ष चेन्नईकडून आणि त्यानंतर एक वर्ष मुंबईकडून खेळला. त्याने एकूण ५९ सामन्यात ३८ च्या सरासरीने फलंदाजी केली. २०१३ साली ७३३ धावांसह तो हंगामातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. आतादेखील तो चेन्नईचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. डेव्हिड हसीने मात्र चेन्नई, पंजाब आणि कोलकाता अशा ३ संघांचे प्रतिनिधित्व केले. त्याने एकूण ६४ सामन्यात २७च्या सरासरीने धावा केल्या. सध्या तो आयपीएलमध्ये समालोचन करताना दिसत आहे.

३. युसूफ आणि इरफान पठाण

युसूफ आणि इरफान पठाण हे दोघेही भारतीय क्रिकेटमधील उपयुक्त अष्टपैलू खेळाडू आहेत. या दोघांनीही भारतीय संघात आपल्या खेळाच्या जोरावर स्थान मिळवले असून आपला ठसा उमटवला आहे.

इरफानने आयपीएलमध्ये १० हंगामात तब्बल ६ संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र पंजाब आणि दिल्लीतील त्याचे योगदान महत्वाचे ठरले. मात्र सध्याची त्याची टी२०तील कामगिरी पाहता या हंगामात त्याला संधी मिळाली नाही. तो सध्या आयपीएलच्या हिंदी समालोचकांच्या पॅनलमध्ये आहे. मात्र युसूफ अजूनही आयपीएलमध्ये पाय रोवून उभा आहे. युसुफने राजस्थान, कोलकाता आणि राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व करत सुमारे १६० सामन्यांमध्ये ३ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत आणि ४२ बळी टिपले आहेत.

४. शॉन आणि मिचेल मार्श

शॉन आणि मिचेल मार्श ही दुसरी ऑस्ट्रेलियन भावंडांची जोडी. शॉन हा प्रामुख्याने कसोटीतील कामगिरीमुळे ओळखला जातो. तर मिचेल हा त्याच्या मोठ्या उत्तुंग फटक्यांमुळे ओळखला जातो. हे दोघेही ऑस्ट्रेलिया संघातील महत्वाचे खेळाडू आहेत.

शॉन हा २००८ ते २०१७ दरम्यान पंजाबकडून आयपीएल खेळला असून पहिल्याच आयपीएलमध्ये त्याने सर्वाधिक ६१६ धावा केल्या होत्या. मात्र यंदाच्या हंगामात त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. मिचेलने डेक्कन चार्जर्स, पुणे वॉरियर्स आणि पुणे सुपरजायंट्स या संघांचे प्रतिनिधित्व करत २० सामन्यात २२५ धावा केल्या आहेत आणि २० बळी टिपले आहेत. मात्र यंदा त्याने आयपीएलमध्ये न खेळता काऊंटी क्रिकेटला पसंती दिली आहे.

५. अॅल्बी आणि मॉर्ने मॉर्कल

या यादीतील पाचवी जोडी म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे अॅल्बी आणि मॉर्ने मॉर्कल. अॅल्बीने टी२० क्रिकेटमध्ये तर मॉर्ने मॉर्कलने कसोटी क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला. मॉर्ने मॉर्कलने ८७ कसोटी सामन्यात ३०९ बळी टिपले आहेत.

अॅल्बीने चेन्नईकडून आयपीएलमध्ये आपला ठसा उमटवला. २०१० आणि २०११ दोन्ही वर्षी त्याने चांगली कामगिरी केली. त्यानंतर तो बंगळुरू, दिल्ली आणि राजस्थान संघाकडूनही खेळला. मात्र २०१७ आणि २०१८च्या लिलावात त्याला कोणीही खरेदी केले नाही. मॉर्ने मॉर्कल दिल्ली, राजस्थान आणि कोलकाता या संघांकडून २००८ ते २०१६ या कालावधीत आयपीएलमध्ये खेळला. त्याने ७० सामन्यांमध्ये ७७ बळी टिपले. मात्र त्यानंतर दुखापतीच्या कारणामुळे त्याने निवृत्ती जाहीर केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 4:00 pm

Web Title: top 5 pairs of brothers in ipl history
टॅग Ipl
Next Stories
1 IPL 2018 – कोलकात्याविरुद्ध पराभवानंतर राजस्थानला मोठा धक्का, फॉर्मात आलेले खेळाडू संघाची साथ सोडणार
2 हे आहे ‘आयपीएल २०१८’ मधील धोनीच्या यशाचे गमक…
3 IPL 2018 – …म्हणून माझ्याऐवजी इशान किशनला खेळवण्याचा निर्णय योग्यच : अादित्य तरे
Just Now!
X