आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. निवृत्तीनंतर सेहवाग सोशल मीडियावरुन अनेक विषयांवर आपली मतं मांडत असतो. अनेक सहकारी खेळाडूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना विरु आपल्या हटके शैलीत ट्वीट करत असतो. सध्या विरेंद्र सेहवाग आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतो आहे.

मोहालीमध्ये सराव करत असताना, ओम प्रकाश नावाचे ९३ वर्षाचे आजोबा सेहवागला भेटण्यासाठी आले होते. सेहवागची भेट व्हावी ही इच्छा मनात धरत ओम प्रकाश यांनी पटियाला ते मोहाली हे ६५ किलोमीटरचं अंतर कापलं. विरेंद्र सेहवागला ही बातमी समजताच त्याने सराव थांबवत ओम प्रकाश यांची भेट घेतली. यादरम्यान आपल्या सर्वात तरुण चाहत्यासाठी खास वेळ काढत विरुने ओम प्रकाश यांच्यासोबत मैदानात गप्पाही मारल्या. त्यांच्या या भेटीचे क्षण सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

या घटनेमुळे विरेंद्र सेहवागचं एक वेगळंच रुप प्रेक्षकांच्या समोर आलं आहे. अनेक नेटीझन्सही या घटनेनंतर विरेंद्र सेहवाचं मनापासून कौतुक केलं आहे. सध्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ विरुच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलच्या मैदानात उतरलेला आहे. त्यामुळे ओम प्रकाश यांच्याकडून मिळालेले आशिर्वाद किंग्ज इलेव्हन पंबाज आणि विरेंद्र सेहवागला भविष्यकाळात किती कामाला येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.