आयपीएलच्या ११व्या हंगामाच्या सुरुवातीपासून मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या वर्षी दमदार प्रदर्शन करणार अशाच अनेकांच्या अपेक्षा होत्या. पण, क्रिकेटच्या या महाकुंभाला सुरुवाच झाली आणि क्रिकेट चाहत्यांचा, मुख्य म्हणजे मुंबई इंडियन्सच्या बाजूने असणाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला. संघाची कामगिरी पाहता मुंबई इंडियन्स सुरुवातीपासूनच आयपीएलच्या ११व्या हंगामात आपली पकड बनवू शकला नाही. त्यातही मंगळवारी वानखेडे स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्या सनरायजर्स हैदराबाद या संघाविरुद्ध मुंबईच्या खेळाडूंचा खेळ पाहाता खुद्द कर्णधार रोहित शर्मानेही अखेर निराशा व्यक्त केली.

हैदराबादने दिलेलं अवघ्या ११९ धावांचं माफक लक्ष्यही मुंबईच्या संघाला गाठता आलं नाही. हा सामना सहज आपल्या खिशात जाणार याच अपेक्षेत मुंबई इंडियन्सचे चाहते असताना पहिल्या २१ धावांमध्येच हैदराबादचं पारडं जड होत असल्याचं पाहायला मिळालं. पाहता पाहता मुंबईचा पूर्ण संघ अवघ्या ८७ धावांमध्येच गारद झाला. त्यामुळे घरच्याच मैदानावर मुंबईच्या संघाला ३१ धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यातही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निदान आजतरी संघाची अफलातून कामगिरी पाहायला मिळेल अशा अपेक्षेत असताना अनेकांचाच भ्रमनिरास झाला.

VIDEO : अशी होती प्रवासवेड्या मित्राची अनोखी विश्वभ्रमंती

घरच्या मैदानावर झालेल्या या पराभवाविषयी कर्णधार रोहित शर्माची नाराजीसुद्धा काही लपली नाही. ‘या पराभवासाठी आम्हीच दोषी आहोत पराभवाची संपूर्ण जबाबदारी आमचीच आहे. मुळात ११८ धावांचं लक्ष्य आम्ही कोणत्याही खेळपट्टीवर गाठू शकलोच असतो. पण, आमच्या संघाने तशी कामगिरी केली नाही. हैदराबादच्या संघाने ती कामगिरी करत हा विजय मिळवला. त्यांच्या संघातील गोलंदाजीने मी फारच प्रभावित झालो आहे. पण, आमच्या फलंदाजांनी मात्र माझी निराशा केली’, असं रोहित म्हणाला. तर सामन्यात असे बरेच क्षण आले ज्यामध्ये आमच्या संघातील उणिवा दिसल्या. पण, आता मी त्या उणीवांविषयी बोलू इच्छित नाही, असं म्हणत रोहितने नाराजी व्यक्त केली. यावेळी रोहितने सनरायजर्स हैदराबादच्या संघातील गोलंदाजांचं तोंड भरुन कौतुक केलं. सोबतच त्यांच्या गोलंदाजीचा सामना करत मुंबईच्या संघातील फलंदाजांनी सामन्याच काही चुका केल्याचं त्याने स्पष्ट केलं. ज्यामध्ये त्याने स्वत:च्या फलंदाजीतही चुका झाल्याचं स्वीकारत संघाच्या पराभवाची जबाबदारी घेतली.