मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामधील सामन्याच्या निमित्ताने मंगळवारी रात्री वानखेडे स्टेडियमवर व्ही.व्ही.एस लक्ष्मणशी बोलताना सचिन तेंडुलकरने १९९८ सालच्या कोका कोला कप स्पर्धेतील एक किस्सा सांगितला. शारजामध्ये झालेल्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिन तेंडुलकरने केलेली वादळी खेळी आजही क्रिकेट चाहते विसरलेले नाहीत. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकात सात बाद २८४ धावा केल्या. सचिन खेळपट्टीवर उभा असताना अचानक वाळूचे वादळ आले. त्यामध्ये २५ मिनिटांचा खेळ वाया गेला.
त्यामुळे ४६ षटकात २७६ धावांचे लक्ष्य मिळाले.

अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला ४६ षटकात २३७ धावा करायच्या होत्या. त्या सामन्यात सचिनने डेमियन फ्लेमिंग, मायकल कासप्रोविच, शेन वॉर्न आणि टॉम मुडीची गोलंदाजी अक्षरक्ष: फोडून काढली. वाळूच्या वादळानंतर मैदानावर घोघावलेल्या सचिनच्या वादळाने ऑस्ट्रेलियाचा संघ सैरभर झाला होता. भारताने २५० धावा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना २६ धावांनी जिंकला पण ते भारताला अंतिमफेरीत दाखल होण्यापासून रोखू शकले नाहीत.

हा सामना सुरु असताना एक किस्सा घडला होता. ज्याचा खुलासा सचिनने काल रात्री केला. सचिन खेळपट्टीवर उभा असताना दुसऱ्या टोकाकडून व्हीव्ही एस लक्ष्मण त्याला साथ देत होता. दोघांनी १०४ धावांची भागीदारी केली. त्यामध्ये लक्ष्मणने ३४ चेंडूत नाबाद २३ धावा केल्या. सामना रंगतदार अवस्थेत असताना फ्लेमिंगचा चेंडू सचिनच्या पॅडला लागला. सचिनने लगेच एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला पण लक्ष्मणने त्याला माघारी पाठवले. खरंतर लक्ष्मणचा तो निर्णय योग्य होता.

पण सचिन लक्ष्मणवर भडकला. धाव का घेतली नाहीस ? असा जाब त्याने विचारला. सचिनचा मैदानावर संयम सुटल्याचे त्यावेळी अनेकांनी पाहिले. सचिनचा संयम सुटल्याची उदहारणे फारच दुर्मिळ आहेत. या घटनेनंतर सचिनचा भाऊ त्याला ओरडला होता. मी तुझ्यावर भडकलो म्हणून मी माझ्या भावाची माफी मागितली व पुन्हा असे घडणार नाही असे त्याला आश्वासन दिले.

घरी गेल्यानंतर मला भावाकडून ओरडा खावा लागला होता. तू काय करत होतास? तो तुझा सहकारी आहे, तो तुला मदत करतोय आणि तू त्याच्यावरच ओरडतोस. मी त्याची माफी मागितली व पुन्हा मैदानावर असे घडणार नाही असे त्याला आश्वासन दिले. सचिनने लक्ष्मणशी बोलताना ही आठवण सांगितली.