महेंद्र सिंग धोनी व अंबती रायडू संघात असल्यामुळे कितीही धावांचं लक्ष्य असेल तरी चेन्नई ते गाठू शकते असा इशाराच प्रतिस्पर्ध्यांना कृष्णम्माचारी श्रीकांतनं दिला आहे. बुधवारी आयपीएल 2018 च्या मोसमात आघाडीवर असलेल्या चेन्नईनं बँगलोरला ज्या पद्धतीनं हरवलं त्याबद्दल श्रीकांतनं आपलं मत व्यक्त केलं आहे.

ए. बी. डिव्हिलियर्स व डी कॉकच्या दमदार फलंदाजीमुळं बँगलोरनं चेन्नीसमोर 206 धावांचं लक्ष्य ठेवलं. ढोणीनं 34 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. तर रायडूनंही 82 धावांची बहुमोल खेळी केली. काही वर्षांपूर्वी चेन्नईचा सल्लागार असलेल्या श्रीकांतनं एका लेखामध्ये ढोणीचं वारेमाप कौतुक करताना बुधवारची खेळी ही धोनीची टी-20 मधली सर्वोत्तम खेळी असल्याचं म्हटलं आहे. पहिल्या चेंडूपासून धोनीची देहबोली अत्यंत सकारात्मक होती आणि कुठलंही दडपण न घेता लक्ष्य पार करता येईल असा आत्मविश्वास त्याच्या दिसत होता असं श्रीकांतनं म्हटलं आहे. धोनीला रायडूची मिळत असलेली साथ बघता, चेन्नईसमोर कितीही धावांचं लक्ष्य ठेवलं तरी ते अपुरंच असेल असा दावाही श्रीकांतनं केला आहे.

रायडूनं या मोसमात सहा सामन्यांमध्ये 158.98 च्या स्ट्राइक रेटनं सर्वाधिक धावा केल्या आहेत. या प्रकारच्या स्पर्धेत सातत्यानं जिंकण्यासाठी चांगली भागीदारी होणं महत्त्वाचं असतं आणि रायडू व ढोणीमुळे चेन्नईच्या संघात ते होत असल्याचं निरीक्षण श्रीकांतनं नोंदवलं आहे. चेन्नईचा पुढचा सामना पुण्यामध्ये मुंबई इंडियन्सशी होणार आहे.