आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या पराभवाची मालिका सुरुच आहे. सनराईजर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात चेन्नईला ७ धावांनी पराभव पत्करावा लागला. या हंगामातली चेन्नईच्या पराभवाची ही हॅटट्रीक ठरली आहे. २०१४ नंतर पहिल्यांदाच चेन्नईच्या संघावर अशी वेळ आली. १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. परंतू त्याचे प्रयत्न तोकडेच पडले. फलंदाजीदरम्यान उष्ण वातावरणामुळे आलेला थकवा आणि धापा टाकणारा धोनी हे चित्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं.

अवश्य वाचा – BLOG : दमलेल्या धोनीची ही कहाणी…

अनेकांनी धोनीच्या झुंजार वृत्तीचं कौतुक केलं तर अनेकांनी धोनीबद्दल सहानुभूती दाखवत त्याने आता निवृत्ती स्विकारावी अशी मागणी केली. भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणनेही धोनीच्या या खेळीवर, खोचक शब्दांत ट्विटर करत टोला लगावला आहे. वय हे काहींसाठी फक्त एक आकडा तर काहींसाठी संघातून स्थान गमावण्याचं कारण असतं असं इरफानने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इरफान पठाणने अनेक सामने धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. २००७ टी-२० विश्वचषक विजेत्या संघातही इरफान पठाण होता. याव्यतिरीक्त आयपीएलमध्ये चेन्नई आणि पुणे या दोन संघांकडून खेळतानाही इरफान धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला. परंतू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून त्याला स्थान मिळालं नाही. निवड समितीच्या रडारवरुन बाहेर फेकला गेलेल्या इरफानने अखेरीस आपली निवृत्ती जाहीर करत समालोचन आणि प्रशिक्षणाकडे आपलं लक्ष वळवलं. हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही धोनीने ३६ चेंडूत नाबाद ४७ धावांची खेळी केली. परंतू संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

अवश्य वाचा – IPL 2020 : धोनीला सूर गवसला, पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी